श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी भारतीय लष्करातील जवान औरंगजेब यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या केली. शहीद जवान औरंगजेब मेजर शुक्लांच्या पथकातील धाडसी जवान होते. शुक्लांच्या पथकाने आजवर सद्दाम पेंढर, समीर टायगरसह 29 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दरम्यान, औरंगजेब यांचे दहशतवाद्यांनी अपहरण करुन हत्या केल्याची घटना उघडकीस झाल्यानंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. तसेच सर्वच स्तरातून मोदी सरकारवर देखील टीका होऊ लागली. यानंतर अखेर बुधवारी (20 जून) संरक्षण मंत्री सीतारामन यांनी औरंगजेब यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
जम्मू-काश्मीरच्या पूँछ सेक्टरमध्ये राहणारे जवान औरंगजेब 44 राष्ट्रीय रायफलमध्ये तैनात होते. सुट्टीसाठी ते घरी आले असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर गुरूवारी (14 जून) रोजी पुलवाला जिल्ह्यातील गुसु गावात त्यांचा मृतदेह सापडला. औरंगजेब यांच्या परिवारातील अनेकांनी सैन्यातून देशाची सेवा केली आहे. त्याचे वडील आणि काकाही सैन्यात होते. औरंगजेब यांच्या काकाला वीरमरण आलं. औरंगजेब यांचा भाऊसुद्धा सैन्यात आहेत.