बेंगळुरू : काही झाले तरी देशाच्या अखंडतेबाबत तडजोड केली जाणार नाही. शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देशाच्या अखंडतेसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. कर्नाटकातील बेंगळुरू येथे आयोजित एरो-इंडिया २०२१ या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना राजनाथ सिंह बोलत होते.
गेल्या काही महिन्यांपासून निर्धारित नसलेल्या सीमांवर बळाचा वापर करून एकतर्फीपणे त्यात बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही बाब दुर्दैवी आहे. मात्र, काही झाले, तरी देशाच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम आहे, असेही राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना सांगितले.
पाकिस्तानावर टीका
आताच्या घडीला भारत विविध आघाड्यांवर अनेकविध अडचणी, आव्हाने यांना सामोरा जात आहे. पाकिस्तान दहशतवादाला छुप्या पद्धतीने पाठबळ देत आहे. जागतिकदृष्ट्या हे घातक आहे. दहशतवादाचा राजकीय फायद्यासाठी पाकिस्तान करत असलेला वापर आता त्यांच्यासाठी सामान्य बाब झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
"शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशही झुकले"; गुलाम नबी आझाद यांनी संसदेत मोदींना सुनावलं
संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद
भारतीय सैन्याची ताकद वाढवणे आणि अधिकाधिक वस्तू भारतात तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी आगामी सात ते आठ महिन्यात सुमारे १३० अब्ज डॉलर खर्च करण्यात येणार आहेत, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली.
दरम्यान, भारत-चीन सीमावादावर अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही. लडाख येथे चीनने भारतात घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला आहे. भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झटापटही झाली. मात्र, भारताने चीनच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले.