नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,79,723 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान आता अनेक नेते मंडळींना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.
"आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सौम्य लक्षणं आहेत. मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून घ्यावे आणि तपासणी करून घ्यावी" असं राजनाथ सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी देखील अनेक नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली, रुग्णांचा आकडा 4,033 वर पोहोचला आहे.
दिल्लीमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे. राजधानीत आधीपासून अस्तित्वात असलेल्या कोरोना डेल्टा व्हेरिएंटसह, ओमायक्रॉन व्हेरिएंट देखील पसरत आहे. कोरोनाच्या संकटात आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचे रुग्ण लवकर बरे होत आहेत. ओमायक्रॉन हा सौम्य आहे आणि डेल्टाच्या तुलनेत त्याची लागण झालेल्या रुग्णांना कमी वेळात डिस्चार्ज दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 185 रुग्ण आले आहेत. त्यापैकी 150 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरीही सोडण्यात आले आहे. रुग्णांपैकी बहुतेक जणांना फक्त सौम्य लक्षणे आहेत आणि 5 ते 7 दिवसांनी डिस्चार्ज मिळत आहे. तर डेल्टाच्या काळात 14 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागत असे. अशा रूग्णांवर ओमायक्रॉन डेडिकेटेड हॉस्पिटल असलेल्या बत्रा हॉस्पिटलमध्ये देखील उपचार केले जातात. रुग्णालयाचे संचालक डॉ. सीएल गुप्ता यांनी आतापर्यंत 30 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. बहुतेक रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत आणि प्रोटोकॉलनुसार निगेटिव्ह चाचणी घेतल्यानंतर आठव्या दिवशी त्यांना सोडण्यात येत आहे. रुग्ण लवकर बरे होत आहेत.