नवी दिल्ली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सियाचिन दौऱ्यावर आहेत. संरक्षणमंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. धोकादायक युद्धभूमी मानल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील सियाचिनमध्ये सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना भेटण्यासाठी राजनाथ सिंह हे सोमवारी (3 जून) या भागाला भेट देणार आहेत. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत त्यांच्यासोबत उपस्थित असणार आहेत.
राजनाथ सिंह हे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह लेहमधील लष्कराच्या 14 कॉर्प्सचे मुख्यालय, तसेच श्रीनगरमधील 15 कॉर्प्सचे मुख्यालय यांनाही भेट देणार आहेत. लष्कराचे उच्चपदस्थ अधिकारी संरक्षणमंत्र्यांना पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेवरील एकूण सुरक्षाविषयक परिस्थितीची, तसेच काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमांबद्दल या दौऱ्यात माहिती देणार आहेत.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीहून जम्मू काश्मीरला भेट देण्यासाठी जात असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. सियाचिनमधील लष्कराचे फील्ड कमांडर आणि सैनिक यांच्याशी संरक्षणमंत्री संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे. शपथविधी आधी राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय शौर्य स्मारकाला भेट दिली होती. शहीद जवानांना आदरांजली वाहिली होती. त्यावेळी त्यांनी तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांशी संवाद साधला होता. तसेच सैन्यापुढील आव्हाने आणि कामांविषयी अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी (3 जून) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शोपियान जिल्ह्यातील मोलू चित्रगम परिसरात सोमवारी चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादीलपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.