नवी दिल्ली - भारतात लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी आले तर चांगले राहील. कारण मोदींमुळे भारत-पाकिस्तानमध्ये शांततेसाठी सकारात्मक पाऊलं उचलता येतील या पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केलेल्या वक्तव्यामागे काँग्रेसचा डाव असू शकतो अशी शंका संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारतातील लोकसभा निवडणुकीबाबत परदेशी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केलं होतं. काश्मीरचा वाद सोडविण्यासाठी पुन्हा भारतात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आले तर चांगले होईल असं इमरान खान यांनी म्हटलं होतं. मात्र नरेंद्र मोदी सरकारला हटविण्यासाठी पाकिस्तानसोबत मिळून काँग्रेसने हा डाव साधला असा आरोप संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी केला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत निर्मला सितारामन म्हणाल्या की, मला माहीत नाही पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी हे वक्तव्य का केलं असावं? काँग्रेसचे अनेक नेते पाकिस्तानात जात असतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्यासाठी मदत करावी अशी मागणी करत असतात. ते नेते नरेंद्र मोदी यांनी हटविण्यासाठी पाकिस्तानची मदत असतात. त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेलं विधानाने मला आश्चर्य झालं नाही. कदाचित हा काँग्रेसचा डाव असू शकतो. मात्र माझं हे वैयक्तिक मतं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
परदेशी पत्रकारांनी मागील आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याशी इस्लामाबाद येथे चर्चा केली. यावेळी पत्रकारांनी भारतातील लोकसभा निवडणुकीबाबत आपल्याला काय वाटतं? असा प्रश्न इमरान खान यांना विचारला होता. त्यावेळी भारत-पाक या दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी आणि काश्मीर मुद्द्याचं निरसन करण्यासाठी निवडणुकीनंतर भारतात नरेंद मोदी पुन्हा पंतप्रधान बनले तर चांगले राहील असं वक्तव्य केलं होतं.
तसेच भारत पाकिस्तानवर पुन्हा हल्ला करु शकतो. १६ ते २० एप्रिल दरम्यान हा हल्ला होऊ शकतो असं पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेला आरोपही संरक्षणमंत्र्यांनी फेटाळून लावला आहे.