नवी दिल्लीः चीन आणि नेपाळ यांच्यात वाढत्या सीमा विवादांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर मोठा हल्लाबोल केला आहे. एक दिवस असा येईल, जेव्हा पीओकेचे लोकच म्हणतील आम्हाला भारतात जायचं आहे, असं विधान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी केलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जम्मू जनसंवाद रॅलीला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, कलम ३७० हटवल्यापासून जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. येत्या पाच वर्षांत आपण जम्मू-काश्मीरचे चित्र इतके बदलू की पीओकेचे लोकही म्हणतील, आम्हाला आता भारतासोबत राहायचे आहे. जेव्हा पीओकेचे लोक आम्हाला पाकिस्तानबरोबर नव्हे, तर भारतात राहायचं आहे, असं म्हणतील त्याच दिवशी आमच्या संसदेचा ठराव पूर्ण झाला, असे आम्ही समजू. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या संरक्षण धोरणात झालेल्या बदलांसंदर्भातही सांगितलं आहे. ते म्हणाले की, हवामान बदलले असून, त्याचा परिणाम आता इस्लामाबादमध्येही पाहायला मिळतोय. पाकिस्तानमध्ये त्याचे पडसाद स्पष्टपणे दिसून येत आहेत. पाकिस्तानची सैन्य सतत गैरवर्तन करीत असते, परंतु भारतीय सैन्य सतत पाकिस्तानच्या कृतींवर लक्ष ठेवून आहे आणि त्यास वेळोवेळी योग्य प्रत्युत्तर देत आहे. संरक्षणमंत्र्यांनीही अजित पंडिता यांना वाहिली श्रद्धांजली जम्मू जनसंवाद रॅलीत दहशतवाद्यांच्या हातून ठार झालेल्या सरपंच अजित पंडिता यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही श्रद्धांजली वाहिली. 1947मध्ये काश्मीर खो-यात तिरंगा फडकवणा-या मोहम्मद मकबूल शेरवानीचींदेखील त्यांना आठवण आली. आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या घोषणा वापरल्या जात असत आणि पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे वापरले जात होते, पण तिथे फक्त तिरंगा डौलानं फडकताना दिसेल, असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा
कोरोनाची दोन नवीन लक्षणं; आरोग्य मंत्रालयानं अपडेट केली यादी... जाणून घ्या!
'या' कठीण काळात भगवद्गीतेमध्ये शोधा शक्ती अन् शांती : तुलसी गबार्ड
CoronaVirus News: लष्करातही कोरोनाचा शिरकाव; काश्मीरमध्ये CRPFचे 31 जवान संक्रमित
CoronaVirus : धोका वाढला! चीनमध्ये कोरोनाची 'दुसरी' लाट; बीजिंगमध्ये लॉकडाऊन