नवी दिल्ली-
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज हिमाचलच्या जयसिंगपूर येथील कांगडा येथे जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी उपस्थितांनी राजनाथ सिंह यांच्यासमोर 'पाकव्याप्त काश्मीर हवा..' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंहे यांनीही तातडीनं प्रतिक्रिया देत पाकव्याप्त काश्मीर आपण घेऊनच राहू...थोडा धीर धरा, असं विधान केलं आहे. भारतीय जनता पक्ष जे काही म्हणतो ते करुन दाखवतो. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर दहशतवादी घटनांमध्ये घट झाली आहे. मला सर्वांना आश्वस्त करायचं आहे की देशातून दहशतवादाचा नायनाट केला जाईल, असंही राजनाथ सिंह म्हणाले.
"माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान मोदी यांचे हिमाचल प्रदेशशी भावनिक नातं राहिलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही याच राज्यातून येतात. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताची जगात प्रतिष्ठा वाढली आहे. आज जेव्हा भारत आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर बोलतो तेव्हा इतर देश आवर्जुन आणि गांभीर्यानं दखल घेतात", असं राजनाथ सिंह म्हणाले.
'भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था'"काँग्रेसच्या काळात महागाई दोन अंकी होती. आज जगातील सर्वात मोठ्या देशांमध्ये महागाईनं दोन अंकी आकडा गाठला आहे. मात्र भारतात महागाई नियंत्रणात आहे. आज भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा भारताची गणना पहिल्या तीन देशांमध्ये होईल. कोरोनाच्या संकटाच्या काळात भारताच्या कोविड व्यवस्थापनाचे जगभरातून कौतुक होत आहे. भारतीय नागरिकांना लसीचे दोन डोस मिळालेत. पण सत्य आपण मान्य केलं पाहिजे की अमेरिकेसारख्या देशातही अद्याप लोकांना लसीचे दोन डोस मिळू शकलेले नाहीत", असं राजनाथ सिंह म्हणाले.
जयराम ठाकूर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाहीजनसभेला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांचंही कौतुक केलं. "जयराम ठाकूर चांगले व्यक्ती आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. त्यांना एक संधी दिली पाहिजे. इतर कोण उमेदवारच दिसत नाही, इथे फक्त कमळाचे फूल सर्वांना दिसत आहे", असंही राजनाथ सिंह म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"