मुंबई - उत्तराखंडच्या प्रदीप मेहराच्या जिद्दीला पाहून अनेकजण त्याच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. सैन्य दलातील काही अधिकाऱ्यांनीही प्रदीप मेहराशी फोनवरुन संवाद साधला. मात्र, आता सर्जिकल स्ट्राईकचे हिरो ठरलेल्या निवृत्त लेफ्टनंट जनरल सतिश दुआ यांनी प्रदीपच्या मदतीसाठी माऊ रेजिमेंटचे कर्नल, माजी सैन्य कमांडर, लेफ्टनंट जनरल राणा कलित यांच्याशी संवाद साधला. तसेच, प्रदीपला भारतीय सैन्य दलात प्रवेश मिळविण्यासाठी, मेरीट पास करण्यासाठी, सर्वोतोपरी आवश्यक तो सराव करुन घेण्यासाठीची चर्चा केली.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून व्हिडीओमधील तरुणाने सर्वाचंच मन जिंकलं आहे. रात्री 12 वाजता रस्त्यावर धावणारा तरुण, मिळालेली लिफ्टची ऑफर नाकारतो. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण खांद्याला बॅग लावून रस्त्यावरून पळताना दिसत आहे. पळत असताना मागून एक कार येते आणि त्यातील व्यक्ती त्याच्याशी गप्पा मारते, त्याला घरी सोडण्याची इच्छा दर्शवते. पण तो त्यासाठी नकार देतो. या दोघांमधील संवादाने अनेकांच्या काळजाला हात घातला आहे. त्यामुळेच, अनेक दिग्गजांनी या तरुणाचं कौतूक केलंय. विशेष म्हणजे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी त्या युवकास थेट सैन्यात भरती करुन घेण्याची मागणी केली आहे. त्यावर, माजी लष्कर अधिकाऱ्याने उत्तर दिलंय.
सैन्यात कुठलिही तरतूद किंवा आरक्षण नाही
सतिश दुआ यांनी माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना चांगलचं सुनावलं आहे. सिंह यांनी प्रदीपला कुठल्याही परीक्षेशिवाय थेट सैन्यात भरती करुन घ्यावे, अशी मागणी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे ट्विटरद्वारे केली होती. त्यावर, सतिश दुआ यांनी उत्तर दिलं आहे. दिग्विजय सिंह हे जरी चांगल्या हेतुने आवाहन करत असतील, तरी मी त्यांच्या मताशी सहमत नाही, कदाचित मला भीतीही वाटते. जरी, प्रदीपचो जोश सर्वोत्कृष्ट असला, तरी त्याला गुणवत्तेनुसारच भरती प्रक्रियेत पात्र व्हावं लागेल. मग, त्याला प्रशिक्षणासाठी मदत केली असेल तरीही. कारण, सैन्यात कुठलिही तरतूद किंवा आरक्षण लागू नाही, असे मत सतिश दुआ यांनी थेट व्यक्त केलं आहे.