मुंबई : कृषी विधेयकावरून आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गदारोळ उडाला. या विधेयकावरून विरोधी पक्षांसह मोदी सरकारच्या मित्रांनीही विरोध करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर शिरोमणी अकाली दलाच्या खासदार आणि मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी गुरुवारी राजीनामा दिला. यावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी म्हटले की, कृषी विधेयकावरून पंतप्रधान जे सांगत आहेत, तरीही जर एनडीएमधील मित्र पक्षाचा मंत्री राजीनामा देत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड असल्याची शंका उपस्थित केली आहे. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. आम्ही स्वत:हून एनडीए सोडले नाही, ते खोटे राजकारण करत होते. यामुळे आम्हाला एनडीए सोडावे लागले. आम्ही एनडीएचे सर्वात जुने सहकारी होतो. इतर पेईंग गेस्ट होते, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
कृषी विधेयकावरून राऊत यांनी सांगितले की, एनडीएने कृषी विधेयकावर चर्चा करायला हवी होती. सरकारने सहकारी पक्षांसोबत रणनीतीक चर्चा करायला हवी होती. मात्र, यावर कोणतीही चर्चा झाली नाही. सर्वजण सांगत आहेत की, या विधेयकामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. पंतप्रधान देशाला सांगत आहेत, की हे विधेयक शेतकऱ्यांविरोधात नाहीय, तरीही जर मंत्री राजीनामा देत असेल तर काहीतरी गडबड आहे, असा संशय राऊत यांनी व्यक्त केला आहे. आधी शिवसेनेने एनडीए सोडले होते, आता अकाली दलाने सोडले आहे, असेही राऊत म्हणाले.