लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यसभेच्या उपसभापतींनी सभागृहात घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यसभेच्या प्रतिष्ठेचे आणि त्या पदाचे अवमूल्यन झाले आहे. आता तेच उपसभापती उपोषणाला बसलेल्या सदस्यांकडे चहा घेऊन जाण्याची गांधीगिरी करतात, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक असल्याने आपण राज्यसभेत उपस्थित राहू शकलो नाही, असे सांगून खा. पवार म्हणाले, राज्यसभेत कृषीविषयक दोन-तीन बिले येणार होती. ती बिले लगेच येतील, असे नव्हते.बिलांसंदर्भात सदस्यांना मते व्यक्त करायची होती. त्या प्रकारचा आग्रह त्यांनी धरला होता. हा आग्रह बाजूला ठेवून सभागृहाचे कामकाज पुढे रेटवून नेण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असावा. सदस्यांनी हे सगळे नियमांच्या विरोधात आहे, हे पुन्हा पुन्हा नियमांचे पुस्तक घेऊन सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना प्रतिसाद न देता त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने सदस्यांच्या भावना तीव्र होऊन ते वेलमध्ये धावले.
सदस्य नियमांचा आधार घेऊन सांगत असतील तर कोणता नियम सांगत होते, ते ऐकून घेण्याची अपेक्षा उपाध्यक्षांकडून होती. पण तो विचार न करता तातडीने मतदान घेण्याचा व आवाजी मतदान पद्धतीने ते मंजूर करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र होती, असे पवार यांनी सांगितले.राष्ट्रपती शासन म्हणजे गंमत आहे का?महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी होत आहे. यावर शरद पवार म्हणाले, राष्ट्रपती शासन लागू करणे म्हणजे काय गंमत आहे का? राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी करणारे लोक कोण आहेत? देशभर त्यांचा प्रभाव किती, असा सवालही त्यांनी केला.