ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - देहरादून येथे २००९ साली खोट्या चकमकीत एका निरपराध एमबीए तरूणाची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या १७ पोलिसांना सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
मेरठ येथे राहणा-या रणबीर (वय २२) नावाच्या तरूणाला गुंड ठरवत २००९ साली पोलिसांनी त्याला ठार केले. पोलिसांनी खोटी चकमक घडवून त्याला ठार केल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यानंतर सीबीआय न्यायालयाने ७ पोलिसांवर अपहरण आणि खून, १० पोलिसांवर खुनाचा कट रचणे आणि एका पोलिसावर पुरावे नष्ट करण्याचा आरोप निश्चित करत १८ जणांना दोषी ठरवले. त्यापैकी १७ पोलिसांना आज जन्मठेपची शिक्षा ठोठावण्यात आली.
देहरादून येथे नोकरीच्या शोधात आलेल्या रणबीरचा २ जुलै २००९ मध्ये खोट्या चकमकीत मृत्य झाला होता. त्याच्यावर २९ गोळ्या झाडण्यात आला होता. तो एक कुख्यात गुंड असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. याप्रकरणाची चौकशी प्रथम सीबीसीआयडीकडे सोपवण्यात आली होती. मात्र त्यावर खूप वाद झाला. राजकीय व सामाजिक दबाव वाढल्यानंतर अखेर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली होती.