देहरादून: उत्तराखंडमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलेनं तिची सर्व संपत्ती काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नावे केली आहे. देहरादूनमध्ये राहणाऱ्या ७८ वर्षीय पुष्पा मुन्जियाल यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती राहुल गांधी यांच्या नावावर केली. यामध्ये ५० लाखांच्या संपत्तीसह १० तोळ्यांच्या सोन्याचा समावेश आहे.
नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यानंतर पक्षात संघर्ष सुरू आहे. काँग्रेसमधील एक गट नेतृत्त्व बदलासाठी आग्रही आहे. त्यामुळे पक्षात एकवाक्यता नाही. अशा स्थितीत पुष्पा मुन्जियाल यांनी राहुल गांधींचं कौतुक केलं आहे. राहुल गांधी आणि त्यांचे विचार देशासाठी गरजेचं असल्याचं पुष्पा म्हणाल्या.
पुष्पा मुन्जियाल यांनी त्यांची सगळी संपत्ती राहुल यांच्या नावे केली आहे. याबद्दल त्यांनी एक मृत्यूपत्र तयार केलं. त्यांच्याकडून ते मृत्यूपत्र देहरादूनमधील न्यायालयात सादर करण्यात आलं. राहुल गांधींच्या विचारांनी प्रभावित झाल्याचं पुष्पा मुन्जियाल यांनी सांगितलं. त्यामुळेच संपूर्ण संपत्ती राहुल यांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतल्याचं त्या म्हणाल्या.
पुष्पा मुन्जियाल यांनी त्यांचं मृत्यूपत्र माजी प्रदेशाध्यक्ष प्रितम सिंह यांच्याकडे सोपवल्याची माहिती काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद शर्मांनी दिली. राहुल गांधीच्या कुटुंबानं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या प्रगतीत मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या कुटुंबानं देशासाठी बलिदान दिलं आहे, असं पुष्पा यांनी मृत्यूपत्र सुपूर्द करताना म्हटल्याचं शर्मांनी सांगितलं.