'काँग्रेस अध्यक्षाच्या निवडीस विलंब अयोग्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 01:50 AM2019-08-10T01:50:38+5:302019-08-10T01:50:48+5:30
पक्षाच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षाच्या निवडीस अजून विलंब लावणे हा पर्याय होऊ शकत नाही, असे त्या पक्षाचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणी व महत्त्वाच्या नेत्यांची उद्या, शनिवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार असून, त्या पार्श्वभूमीवर सिंघवी यांनी हे मत व्यक्त केले आहे.
लोकसभा निवडणुकांत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी २५ मे रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचे मन वळविण्याचे काँग्रेसमधील नेते, कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. मात्र राजीनामा मागे न घेण्याच्या विचारावर राहुल गांधी ठाम आहेत. त्यामुळे दोन महिन्यांहून अधिक काळ काँग्रेस पक्ष अध्यक्षाविनाच आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी अध्यक्ष व्हावे यासाठी त्यांची मनधरणी पक्षनेत्यांनी केली. मात्र अध्यक्षपदासाठी आपले नाव चर्चेत आणल्याबद्दल प्रियांका गांधी यांनी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत हंगामी पक्षाध्यक्षाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे की, कार्यकारिणीने पक्षाध्यक्षाची लवकरात लवकर निवड करावी. त्यामध्ये विलंब होऊ नये.
कोण होईल नवा अध्यक्ष?
पक्षाध्यक्षच नसणे हे काँग्रेससाठी हानिकारक ठरू शकते, अशी भावना आतापर्यंत काही काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. पक्षाचा पुढचा अध्यक्ष गांधी घराण्यातील नसावा, अशी इच्छाही राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षाध्यक्ष निवडताना काँग्रेस कार्यकारिणीला बरेच विचारमंथनही करावे लागणार आहे.