हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या १०० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्यास विलंब होऊ शकतो. आपले उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्ष नेतृत्व राज्यांतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठका घेत आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांची नावे असू शकतात, असा दावाही करण्यात येत आहे.
भाजप नेतृत्वाचे असे मत आहे की, १०० नावांची पहिली यादी जाहीर केल्याने गोंधळात असलेल्या इंडिया आघाडीतील पक्षांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि इतर राज्यांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘बुडत्या जहाजाला’ बाजूला करत आहेत. पहिली यादी महत्त्वाची ठरेल, कारण सत्ताधारी पक्षाने लोकसभेच्या ५४३ पैकी ३७० जागा जिंकण्याचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.
महाराष्ट्रात मित्रपक्षांना आणखी प्रतीक्षा nमहाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार गट यांच्यासह मित्रपक्ष जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची वाट पाहत आहेत. बारामतीसह जिंकू न शकलेल्या १६० जागांचेही भाजपने लक्ष्य ठेवले आहे. nया जागा एनडीएकडे आणण्यासाठी वजनदार नेत्यांना या ठिकाणी रिंगणात उतरवायचे आहे. उत्तर प्रदेशातही राजभर, अनुप्रिया पटेल, संजय निषाद आणि इतर नेत्यांसोबतची चर्चा राजकीय कारणांमुळे प्रलंबित आहे.
बिहारमध्ये अडचणीभाजपचे काही अंतर्गत प्रश्नही आहेत. बिहारमध्ये जदयूला २०१९ प्रमाणे १७ जागा द्यायच्या का याबाबतही विचार सुरू आहे. पासवान यांच्या पक्षाच्या दोन गटांसोबत जागावाटपाचा मुद्दाही भाजपला हाताळावा लागत आहे. पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील गटाशी चर्चा होत आहे. उपेंद्र कुशवाह, जीतनराम मांझी यांना जागा द्यायची की नाही हेही ठरवायचे आहे.