हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारत बायोटेक या स्वदेशी औषध कंपनीने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यास जागतिक आरोग्य संघटना विलंब लावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेतले असून, ते पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. कोव्हॅक्सिनच्या वापराला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानेही अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळेही मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात अडथळा येण्याच्या शंकेने भारत चिंताग्रस्त झाला आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व भारत बायोटेक कंपनीने संयुक्तरित्या कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली कोरोना लस घेतलेल्या व्यक्तिलाच युरोप किंवा अमेरिकेत प्रवेश देण्यात येतो. कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेने लवकरात लवकर मान्यता द्यावी, म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या पुढील आठवड्यातील अमेरिका दौऱ्यामध्ये त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी मागणी भारताने जागतिक आरोग्य संघटनेकडे लावून धरली आहे.
त्याचसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी त्या संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची ऑगस्टमध्ये भेट घेऊन चर्चा केली होती. हीच मागणी मांडवीय यांच्या आधीचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही केली होती. जागतिक आरोग्य संघटनेतील लस विभागाचे सहाय्यक संचालक मरिन सिमाओ यांनी भारतीय अधिकाऱ्यांना असे कळविले की, जागतिक आरोग्य संघटनेकडून कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत मान्यता दिली जाईल. कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला इराण, फिलिपाईन्स, मॉरिशस, मेक्सिको, गियाना, नेपाळ, पेरुग्वे, झिम्बाब्वे या देशांनीही मान्यता दिली आहे. ब्राझिलने कोव्हॅक्सिन खरेदी करण्यासाठी संबंधित कंपनीशी करार केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आजवर फायझर - बायोएनटेक, ॲस्ट्राझेनेका (हिचे भारतातील रुप म्हणजे कोविशिल्ड), जॉन्सन ॲण्ड जॉन्सन, मॉडेर्ना, सिनोफार्म या कंपन्यांच्या लसींच्या आपत्कालीन वापराला मान्यता दिली आहे.
लवकरच निर्णय होण्याची शक्यता
कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले की, कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेकडून लवकरच मान्यता मिळेल. त्यामुळे त्याबद्दल चिंता करण्याचे काही कारण नाही. कोव्हॅक्सिनसंदर्भात पुरविलेल्या माहितीचा जागतिक आरोग्य संघटना सध्या अभ्यास करत आहे. कोव्हॅक्सिनबाबत ही संघटना लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.
उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत ८ हजारांनी घट
देशभरात गेल्या चोवीस तासांमध्ये ३० हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण सापडले व आणखी ४३१ जणांचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ८ हजारांनी घट झाली. राज्यांमध्ये सर्वाधिक १७ हजार नवे रुग्ण एकट्या केरळमध्ये आढळले. कोरोना रुग्णांची एकूण आकडेवारी ३ कोटी ३३ लाखांवर पोहोचली आहे.