मुंबई/नवी दिल्ली : प्रवाशांचे ‘चेक-इन’ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकीय सॉफ्टवेअरमध्ये झालेला बिघाड शनिवारी दुपारपर्यंत दुरुस्त झाला असला तरी त्याचा परिणाम म्हणून रविवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशीही एअर इंडियाच्या जगभरात जाणाऱ्या विमानांना विलंब झाला. मुंबईतील सेवेलाही फटका बसून रविवारी ५० पेक्षा जास्त विमानांना विलंब झाला. शनिवारी एअर इंडियाच्या ४० उड्डाणांना विलंब झाला होता.
शनिवारप्रमाणेच रविवारीही विविध विमानतळांवर प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. विमान नेमके केव्हा सुटेलयाची नक्की माहिती नसल्याने तासन्तास ताटकळत बसावे लागले. अनेकांची पुढच्या प्रवासाची विमाने चुकल्याने त्यांना वेळ आणि पैसा या दोन्हींचा भुर्दंड पडला. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, एका मार्गावर गेलेले विमान परत आले की ते दुसºया मार्गावर उड्डाण करते. शनिवारी विमानांना जाताना व परत येतानाही विलंब झाल्याने साहजिकच या विमानांची रविवारची उड्डाणेही उशिराने झाली.
प्रवासीही हैराण
शनिवारी एकूण १४९ विमानांच्या उड्डाणांना विलंब झाला होता. परिणामी रविवारी १३७ उड्डाणे उशिराने झाली. रविवारच्या उड्डाणांचा सरासरी विलंब तीन तासांहून अधिक होता.