नवी दिल्ली : काश्मीरची स्थिती समजावून घेण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या नेतृत्वाखाली सर्व राजकीय पक्षांच्या २८ नेत्यांचे शिष्टमंडळ रविवारी तिथे जाणार असून, या मंडळात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांचा मात्र प्रतिनिधी नाही. या २८ नेत्यांची बैठक शनिवारी राजनाथसिंग यांनी बोलावली असून, बैठकीत ते काश्मीरमधील परिस्थिती आणि केंद्र व राज्य सरकारने उचललेली पावले याची माहिती देणार आहेत.हे शिष्टमंडळ काश्मीरमध्ये काही नेते, काही संघटना तसेच पक्षांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करणार आहे. फुटीरवादी संघटनांच्या प्रतिनिधींशीही हे नेते चर्चा करतील.या शिष्टमंडळात अर्थमंत्री अरुण जेटली, अन्न व नागरी पुरवठामंत्री राम विलास पासवान, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाब नबी आझाद, काँग्रेसचे राज्यसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, एमआयएमचे असाउद्दिन ओवेसी, जनता (यू)चे शरद यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा, माकपचे सीताराम येचुरी, शिवसेनेचे संजय राऊत आणि आनंदराव अडसुळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तारीक अन्वर अकाली दलाचे प्रेमसिंग चंदुमांजरा तसेच तेलगू देसम, तृणमूल काँग्रेस, बीजू जनता दल, मुस्लीम लीग, वायएसआर काँग्रेस, आप, द्रमुक आदी पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे.काश्मीरमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याच्या प्रस्तावाला समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांचाही पाठिंबा आहे. मात्र त्यांनी शिष्टमंडळासाठी आपला प्रतिनिधी नियुक्त केला नाही, असे सांगण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)शिष्टमंडळाला भेटू नकाश्रीनगर : सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मिरात येणार असले तरी जनतेने तसेच राजकीय आणि विविध संघटनांच्या नेत्यांनी व प्रतिनिधींनी शिष्टमंडळाच्या भेटीला जाउ नये, असे आवाहन हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी काश्मिरींना केले आहे. शिष्टमंडळातील नेत्यांना व खासदारांना काश्मीर हा वादाचा विषय आहे, हे मान्यच नसेल तर त्यांना भेटण्यात मतलब नाही, असे गिलानी यांनी म्हटले आहे.
काश्मीरला जाणार २८ नेत्यांचे शिष्टमंडळ
By admin | Published: September 03, 2016 3:02 AM