नवी दिल्ली : गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरील शेकडो वैयक्तिक कर्ज ॲप्सचा आढावा घेतला असून, त्यातील संशयास्पद वाटणारे असंख्य ॲप्स प्लॅटफॉर्मवरून हटविले आहेत.एका ब्लॉग पोस्टमध्ये गुगलने ही माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले की, आमच्या सुरक्षा धोरणांचा भंग करणारे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून हटविण्यात आले आहेत. आपल्या ॲपने स्थानिक आणि केंद्रीय नियमांचे पालन केले आहे, हे पाच दिवसांत सिद्ध करण्याचे निर्देश ॲपच्या विकासकांना देण्यात आले आहेत. विशेषत: कर्ज परतफेडीचे वेळापत्रक आणि व्याजदर याबाबतच्या नियमांचे पालन केले आहे का, याची विचारणा त्यांच्याकडे करण्यात आली आहे.ऑनलाइन झटपट कर्ज देणाऱ्या ॲप्सबाबत रिझर्व्ह बँकेने अलीकडेच चिंता व्यक्त केली होती. हे ॲप्स अव्वाच्या सव्वा व्याज आकारत असून, हा नियमांचा भंग आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते. डिजिटल कर्जांबाबत नियम निश्चित करण्यासाठी एक कार्य समूह स्थापन करण्यात येत असल्याची घोषणाही रिझर्व्ह बँकेने केली होती. बिगर बँकिंग संस्थांशी संबंधित डिजिटल कर्जदात्यांसाठी नव्या नियमावलीसह एक अधिसूचना रिझर्व्ह बँकेने जून २०२० मध्ये जारी केली होती.
अव्वाच्या सव्वा दंड आकारणी -ऑनलाइन झटपट कर्ज देणाऱ्या ॲप्सबाबत रिझर्व्ह बँकेने अलीकडेच चिंता व्यक्त केली होती. हे ॲप्स अव्वाच्या सव्वा व्याज आकारत असून, हा नियमांचा भंग आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते.