ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 24 - छत्रपती शिवाजी महाराजांची अवमानना करणारा आग्रा किल्ल्यावर लावण्यात आलेला शिलालेख काढून टाकण्यात आला आहे. वादग्रस्त शिलालेख काढून त्याठिकाणी योग्य माहिती देणारा शिलालेख लावण्यात आला आहे. राज्यपाल राम नाईक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन योग्य शिलालेख लावला असल्याची खातरजमा करुन घेतली. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या प्रांतीय अधिवेशनाचं उद्घाटन करण्यासाठी आग्रा येथे गेले असता राज्यपाल राम नाईक यांनी आग्रा किल्ल्याला भेट दिली.
यावेळी बोलताना राम नाईक यांनी सांगितलं की, "जगभरातील पर्यटक जरी ताजमहाल पाहण्यासाठी आग्र्याला येत असले, तरी मराठी माणसांना छत्रपतींच्या आग्रा भेटीच्या स्फुर्तिदायी इतिहासाला उजाळा देण्यासाठी आग्रा किल्ल्यालाही आवर्जून भेट द्यायची असते. अशाच एका भेटीत महाराष्ट्रातून आलेल्या एका पर्यटकाचे आक्षेपार्ह आणि बदनामीकारक शिलालेखाकडे लक्ष गेले. इतिहासाचा विपर्यास करुन सदर शिलालेखात आग्र्याचा उन्हाळा सहन न झाल्याने महाराज मूर्च्छा येऊन पडले आणि त्यावेळी त्यांनी दिवाण-ए-खासमधील खांब पकडला असा जावईशोध लावण्यात आला होता".
"औरंगजेबाने केलेला उपमर्द सहन न होऊन छत्रपती शिवाजी महाराज कसे संतापाने याच दिवान-ए-खासमध्ये कडाडले होते याची शूरगाथा सर्वविदित असतानाही बदनामीकारक शिलालेख लावण्यात आला होता. आता तो शिलालेख काढून नव्याने शिलालेख लावण्यात आला असून त्याठिकाणी "दिवान-ए-खास मे शिवाजी औरंगजेब से मिलने सन 1966 मे आये थे" असं लिहिण्यात आलं आहे", अशी माहिती राम नाईक यांनी दिली.
राम नाईक यांनी शिलालेख बदलल्याची खातरजमा केली, सोबतच किल्ल्यासमोरील छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा आणि परिसराच्या सुशोभीकरणाची जबाबदारी त्यांनी आग्रा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विश्वविद्यालयाकडे सोपवली.