दिल्लीच्या दोन मोठ्या रुग्णालयांनी व्हेंटिलेटर रिकामं नसल्याचं कारण देत जखमी रुग्णाला परत पाठवलं. यानंतर रूग्णाचा रूग्णालयाबाहेर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. पोलीस मृत्यू झालेल्या व्यक्तीला एका प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणत होते, त्यावेळी त्याने कारमधून उडी मारली, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी अनेक रुग्णालयात नेलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उत्तर पूर्व दिल्लीतील उस्मानपूर भागातील आहे. येथे 2 जानेवारी रोजी संध्याकाळी एका महिलेने पोलिसांना फोन करून माहिती दिली की कोणीतरी तिच्या घराबाहेर शिवीगाळ करत आहे. यानंतर दोन पोलीस आले आणि त्यांनी प्रमोद नावाच्या आरोपीला आपल्या गाडीत बसवून चौकशीसाठी निघाले. दरम्यान, वाटेत प्रमोदने उलट्या झाल्याचा बहाणा करून गाडीच्या खिडकीतून बाहेर उडी मारली. प्रमोद दारूच्या नशेत होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
उडी मारल्याने प्रमोदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर, पोलिसांनी त्याला प्रथम जीटीबी रुग्णालयात नेले, परंतु तेथे सीटी स्कॅनची सुविधा नसल्यामुळे त्याला एलएनजेपीमध्ये रेफर करण्यात आले, परंतु एलएनजेपीमध्ये व्हेंटिलेटर नसल्यामुळे त्याला आरएलएममध्ये पाठवण्यात आले. मात्र तेथेही व्हेंटिलेटर रिकामं नसल्याने दाखल केले गेले नाही. यानंतर पुन्हा एलएनजेपीला आणताना जखमी प्रमोदचा मृत्यू झाला.
याबाबत आरएमएल रुग्णालय प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथून प्रतिसाद मिळाला नाही. तर एलएनजेपी रुग्णालयाचे एमएस सांगतात की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी प्रमोदचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आता प्रमोदचा मृत्यू नेमका कसा झाला हे समोर येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.