Swati Maliwal : आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना सोमवारी दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी स्वीय सहाय्यक विभव कुमार यांनी मारहाण केल्याचा दावा भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. सोमवारी सकाळी दिल्ली पोलिसांना सलग दोन कॉल आले होते. हे दोन्ही कॉल सिव्हिल लाइन्समधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून आले होते. फोनवरुन आप नेत्या स्वाती मालीवाल असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने कथितपणे प्राणघातक हल्ला झाल्यानंतर आपत्कालीन नंबर लावला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, स्वाती मालीवाल सोमवारी सकाळी ९:१० च्या सुमारास अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या होत्या. मात्र त्यांना त्ंयाच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांनी भेटण्यास नकार दिला. यानंतर, सकाळी ९:३१ मिनिटांनी मालीवाल यांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदत मागितली. त्यानंतर सकाळी ९:३४ वाजता त्यांचा कॉल नियंत्रण कक्षाकडे हस्तांतरित करण्यात आला. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर मालीवाल यांना ठाण्यात आणण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली. प्रोटोकॉलनुसार दिल्ली पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यमंत्र्यांच्या घरात कोणीही प्रवेश करू शकत नाहीत.
पहिल्या कॉलमध्ये फोन करणाऱ्याने दावा केला की, आपण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होतो, जिथे मुख्यमंत्र्यांचे त्यांचे सहकारी बिभव कुमार यांच्याशी भांडण झाले. दुसरा कॉल आल्यानंतर महिलेने सांगितले की, मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होती, जिथे त्यांनी त्यांचा सहकारी बिभव कुमारला मला क्रूरपणे मारहाण करण्याची सूचना दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
विभव कुमार हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक होते. सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप असलेल्या एका प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केल्यानंतर त्यांना गेल्या महिन्यात त्यांच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.
'आम्हाला सकाळी ९:३४ वाजता एक पीसीआर कॉल आला ज्यामध्ये कॉलरने सांगितले की मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि एसएचओ यांनी कॉलला प्रतिसाद दिला. काही वेळाने खासदार स्वाती मालीवाल सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात आल्या. याप्रकरणी त्यांच्याकडून कोणतीही तक्रार आलेली नाही,' असे पोलीस उपायुक्त मनोज मीणा यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने सोमवारी सांगितले की ते राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावरील कथित हल्ल्याची चौकशी करण्यासाठी एक चौकशी पथक पाठवणार आहे आणि याप्रकरणी कारवाईचा अहवाल पाठवण्यासाठी दिल्ली पोलिसांना औपचारिक पत्र देखील पाठवणार आहे.