नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोर आला आहे. भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मात्र हा जाहीरनामा तयार करण्यात काँग्रेस नेत्याचा देखील समावेश होता. राजकुमार चौहान अस त्या काँग्रेस नेत्याचे नाव आहे.
भाजपचा जाहीरनामा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे चौहान आता काँग्रेसमध्ये आहे. या संदर्भात त्यांची संपर्क केला असता ते म्हणाले की, आपण काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलो होतो. तेंव्हा भाजपकडून त्यांचा जाहीरनामा करणाऱ्या समितीत सामील करून घेण्यात आले होते. जाहीरनामा करण्यासाठी आपण अनेक सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान भाजपमध्ये सामील झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्याला बोलवणे धाडले. त्यानंतर भाजप सोडून आपण पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्याचे चौहाण यांनी सांगितले. भाजपने जाहीरनाम्यावर चौहाण यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. चौहाण हे शीला दीक्षित सरकारमध्ये पीडब्ल्यूडी मंत्री होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष पूर्ण जोर लावत आहेत. सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस यांच्यात येथील लढत होत आहे. त्यातच शुक्रवारी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. मात्र या जाहीरनाम्यावरच काँग्रेस नेत्यांचं नाव आले आहे.