नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेत आप सरकारने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचा भारतरत्न काढून घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या वादादरम्यान आप नेत्या अलका लांबा यांच्याकडून राजीनामा मागण्यात आला आहे. त्यांचे पार्टीतील सदस्यत्वही रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अलका लांबा यांनी संबंधित प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. यामुळे लांबा यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सोमनाथ भारती यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. सोमनाथ भारती यांना पार्टीच्या प्रवक्तेपदावर हटवण्यात आले आहे. संबंधित प्रस्ताव आपणच दिल्याचा दावा सोमनाथ भारती यांनी केला आहे. या प्रस्तावामध्ये राजीव गांधी यांचा भारतरत्न काढून घेण्याची मागणी करण्यात आली होती.
(राजीव गांधींचा 'भारतरत्न' परत घ्या! आपकडून दिल्लीत प्रस्ताव मंजूर)
दरम्यान, राजीव गांधी यांच्याविरोधात पार्टीनं मांडलेल्या प्रस्तावासंबंधी अलका लांबा नाराज होत्या. अलका लांबा यांनी आपच्या भूमिकेविरोधात जाऊन सोशल मीडियावर संबंधित प्रस्तावाची माहिती शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली. यावरुन पक्षाचे नेतृत्व लांबा यांच्यावर नाराज झाले. दुसरीकडे, पार्टीनं मांडलेल्या प्रस्तावाचा विरोध दर्शवत वॉक ऑउट केल्याचा दावा लांबा यांनी केला आहे.
आपच्या या भूमिकेचा काँग्रेसनं तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अयज माकन यांनी म्हटलं की, राजीव गांधी यांनी देशासाठी आपले जीवन अर्पण केले. पण या प्रस्तावामुळे आम आदमी पार्टीचा खरा चेहरा समोर आला आहे.
दिल्ली विधानसभेमध्ये सत्तेत असणाऱ्या आपने पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील येत्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन ही खेळी केली आहे. आपने विधानसभेमध्ये राजीव गांधी यांच्यामुळे शीख दंगल उसळली होती. ते या दंगलीला जबाबदार होते. यामुळे त्यांना देण्यात आलेला देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न काढून घेण्यात यावा, असा प्रस्ताव आपने शुक्रवारी मांडला. तो बहुमताने मंजूर करण्यात आला.