नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीतून धडा घेत यावेळी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणूक इतर पक्षांसोबत युती करून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाला टक्कर देण्यासाठी काँग्रेसनेराष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या इतिहासात काँग्रेस पक्ष प्रथमच आघाडी करून निवडणुकीला सामोरा जाणार आहे.
दिल्लीत काँग्रेस 70 पैकी 66 जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर राजदला चार जागा सोडणार आहे. मात्र यावर अद्याप उभय पक्षांचे एकमत झाले नाही. या संदर्भात शनिवारी उभय पक्ष पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सहमतीनंतरच राजदसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वोत्तर राज्यातील आणि बिहारच्या मतदारांना आकर्षीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राजदने दिल्लीत 10 जागांची मागणी केली आहे. तर काँग्रेसने राजदसमोर चार जांगाचा पर्याय ठेवला आहे.
काँग्रेसने आतापर्यंत 42 जागांवरील उमेदवार निश्चित केले आहेत. तर शुक्रवारी रात्री उर्वरित मतदार संघातील उमेदवार निश्चित करण्यात येणार आहे. मात्र अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चोपडा यांनी सांगितले आहे.