नवी दिल्ली: दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत 'नवी दिल्ली' मतदारसंघ नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचे कारण म्हणजे या मतदारसंघाने दिल्लीला आतापर्यंत पाच मुख्यमंत्री दिले आहेत. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
'नवी दिल्ली' विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या दिवंगत नेत्या व माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित ह्या सलग तीनवेळा निवडणूक जिंकल्यावर मुख्यमंत्री राहिल्या होत्या. त्यांनतर अरविंद केजरीवाल हे सुद्धा सलग दोनवेळा याच विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून, ते सुद्धा दोन्ही वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र गेल्या पाच वेळेपासून भाजपला या मतदारसंघात पराभव पाहावा लागला आहे.
विधानसभेची स्थापना झाल्यापासून हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि चर्चेचा ठरला आहे. 2008 च्या निवडणुकीपूर्वी या मतदारसंघाचे नाव 'गोल मार्केट' असे होते. 1993 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या मतदारसंघातून क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांना उमेदवारी देऊन निवडणूक चुरशीची केली होती. तर आझाद यांनी काँग्रेसचे उमेदवार बृजमोहन यांचा पराभव करत विजय मिळवला होता. मात्र त्यांनतर भाजपला आतापर्यंत एकदाही या मतदारसंघातून उमेदवार निवडून आणता आला नाही.
1998 मध्ये दुसऱ्यांदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने शीला दीक्षित यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत शीला दीक्षित यांनी केवळ भाजपच्या कीर्ती आझाद यांचा पराभव केला नाही तर मुख्यमंत्री बनून राज्याच्या राजकारणातही त्यांचे वर्चस्व कायम ठेवले. पुढे या मतदारसंघातून 2003 साली भाजपने कीर्ती आझाद यांची पत्नी पूनम आझाद यांना मैदानात उतरवले, पण त्यांनाही शीला दीक्षितसमोर पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे शीला दीक्षित सलग तीन वेळा निवडून येऊन मुख्यमंत्री सुद्धा राहिल्या.
मात्र 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी दीक्षित यांचा 25,864 मतांनी पराभव केला. त्यांनतर 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत सुद्धा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून पुन्हा केजरीवाल यांनी विजय मिळवत विधानसभेत बहुमत सिद्ध करत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे सलग पाचवेळा मुख्यमंत्री देणारा हा मतदारसंघ आगामी निवडणुकीत चर्चेचा विषय ठरणार आहे.