नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजप खासदार प्रवेश वर्मा यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. सिसोदिया यांनी आपले वकील इरशाद यांच्याद्वारे पाठवलेल्या नोटीसमध्ये भाजप नेत्याला, पुढील 24 तासांत लेखी माफी मागावी अन्यथा मानहानी केल्याबद्दल कायदेशीर कारवाईचा सामना करण्यासासाठी सज्ज व्हावे असा इशारा दिला आहे.
नोटीसमध्ये इरशाद यांनी म्हटले की, 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत वर्मा यांनी मनिष सिसोदिया यांच्याविषयी चुकीचे आणि मानहानी करणारे आरोप केले आहे.
प्रवेश वर्मा यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी सिसोदिया यांचे ओएसडी गोपाल कृष्ण माधव यांच्या अटकेनंतर म्हटले होते की, लाचेचा पैसा सिसोदिया यांच्यापर्यंत पोहोचत आहे. याच पैशातून शाहीन बागेत बिर्यानी पोहोचते आणि निवडणुका लढवल्या जातात. सीबीआयने गुरुवारी सिसोदिया यांचे ओएसडी गोपाल यांना दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पाकडले होते.
यावर सिसोदिया यांनी कडक टिप्पणी करताना आरोपी गोपाल याला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती. तसेच गोपाल लाचखोर असल्याचे माहित असते तर त्याला आधीच काढून टाकले असते. दरम्यान भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून समोर आलेल्या आपच्या नेत्यांसोबत लाचखोर अधिकारी असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.