नवी दिल्ली : शनिवारी सायंकाळी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली असून 54 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये तब्बल 32 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर 14 आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीनंतर त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे.
काँग्रेसने आपल्या घराणेशाही 'प्रथा'प्रमाणेच उमेदवारी दिली असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चोपड़ा यांची मुलगी शिवानी चोपड़ा पासून तर प्रचार समिती प्रमुख कीर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम आझाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जवळपास डझनभर असे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी पक्षातील नेत्यांच्या मुला-मुलींना, पत्नी, सून इत्यादींना तिकिट देण्यात आले आहे.
यात प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा यांची कन्या शिवानी चोप्रा यांना कालकाजी विधानसभा मतदारसंघातून, प्रचार समिती प्रमुख कीर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम आझाद यांना संगम विहार विधानसभा मतदारसंघातून, ज्येष्ठ नेते योगानंद शास्त्री यांची कन्या प्रियंका सिंग यांना आर.के. पुरम विधानसभा मतदारसंघातून तर माजी आमदार कंवर करण सिंह यांची मुलगी आकांक्षा ओला यांना मॉडल टाउन मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
त्याच बरोबर पक्षाचे जिल्हाध्यक्ष कैलास जैन यांची सून त्रिपाठी जैन यांना पूर्व दिल्लीतील बाबरपूर मतदारसंघातून, माजी आमदार हसन अहमद यांचा मुलगा अली मेहंदी यांना मुस्तफाबाद मतदारसंघातून, माजी आमदार प्रेम सिंह यांचे पुत्र यदुराज सिंह यांना आंबेडकर नगर मतदारसंघातून, माजी आमदार बिजेंद्रसिंग यांचा मुलगा मनदीप सिंग यांना नांगलोई जाट मतदारसंघातून, माजी प्रदेशाध्यक्ष राम बाबू शर्मा यांचा मुलगा विपिन शर्मा यांना रोहतास नगर मतदारसंघातून, ज्येष्ठ नेते बूटा सिंग यांचा मुलगा माजी आमदार अरविंदरसिंग यांना देवली मतदारसंघातून तर करोलबाग विधानसभा मतदारसंघातून स्थानिक नेत्याचा मुलगा गौरव धनक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.