दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि जंगपुरा विधानसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार मनीष सिसोदिया यांनी निडणूक लढवण्यासाठी देणगी देण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. मी दहा वर्षे इमानदारीने राजकारण केलं, पण पैसे कमावले नाहीत. त्यामुळे आता निवडणूक लढवण्यासाठी मला निधीची आवश्यकता आहे, त्यासाठी मी एक संकेतस्थळ तयार केलं असून, तिथून तुम्ही देणगी देऊ शकता, असं आवाहन मनीष सिसोदिया यांनी केलं आहे.
जनतेकडे देणगी मागताना मनीष सिसोदिया म्हणाले की, मागच्या दहा वर्षांमध्ये मी इमानदारीने राजकारण केलं आहे. मी आता जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. जनताच मला निवडणूक लढवण्यास मदत कलेल, अशी मला अपेक्षा आहे. ही निवडणूक लढवण्यासाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी मी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. तिथून तुम्ही ऑनलाइन देणगी देऊ शकता.
ही देणगी दिल्यानंतर तुम्हाला एक ८०जी चा मेल मिळेल. हा फंड आम्ही पारदर्शक ठेवला आहे. किती देणगी आली आहे आणि कुणिी देणगी दिली आहे, ते त्यावर दिसेल. जर कुणाला देणगी गोपनीय ठेवायची असेल तर तो ती गोपनीय ठेवू शकतो. त्याचाही पर्याय उपलब्ध असेल, असे मनीष सिसोदिया यांनी सांगितले. तसेच शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाचं राजकारण करण्यासाठी मला देणगी द्या, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.