दिल्ली विधानसभेत उलथापालथीचे संकेत?; केजरीवालांसह आपचे सर्वच दिग्गज सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 09:16 IST2025-02-08T09:15:57+5:302025-02-08T09:16:43+5:30
मागील दोन टर्ममध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षासाठी यंदा सत्तेची वाट बिकट असल्याचं दिसत आहे.

दिल्ली विधानसभेत उलथापालथीचे संकेत?; केजरीवालांसह आपचे सर्वच दिग्गज सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर
Delhi Election Result Updates: दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीला आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली असून पहिल्या काही कलांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाची स्थिती दयनीय असल्याचं दिसत आहे. कारण नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल हे पिछाडीवर असून या मतदारसंघात भाजप उमेदवाराने आघाडी घेतली आहे. केजरीवाल यांच्यासह दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेदेखील पिछाडीवर असल्याचं समोर आलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक निकालात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने चांगलीच आघाडी घेतल्याचं दिसत आहे. विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजप सध्या ४३ जागांवर आघाडीवर असून आपने २६ जागांवर आघाडी घेतली आहे . तर कधीकाळी दिल्लीत सत्तेत असलेल्या काँग्रेसला अवघ्या एका जागेवर आघाडी घेण्यात यश आलं आहे. त्यामुळे मागील दोन टर्ममध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षासाठी यंदा सत्तेची वाट बिकट असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, आम आदमी पक्ष पिछाडीवर दिसत असला तरी हे प्राथमिक कल असून मतमोजणीच्या आणखी अनेक फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे पुढील फेऱ्यांत भाजपला मागे टाकत आप आघाडी घेणार की भाजप २७ वर्षांनंतर पुन्हा दिल्लीची सत्ता काबीज करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मागील निवडणुकीत कोणाला किती जागा?
दिल्लीत विधानसभेच्या एकूण ७० जागा असून बहुमतासाठी ३६ जागा जिंकणं आवश्यक आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत आपने ६२ तर भाजपने ८ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला खातं उघडण्यातही यश आलं नव्हतं.