Delhi Assembly Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहिणी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी विचार न करता बोलल्याचा आणि देशाच्या राजधानीतील जनतेला विकासाची खोटी आश्वासने दिल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. केजरीवाल हे काय आहेत हे अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केजरीवालांवर खोटी आश्वासने देण्याचा आरोप केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीतील प्रदूषण संकटाचे कारण हे सरकारची निष्क्रियता असल्याचे म्हटलं. दिल्ली विधानसभा निवडणुका २०२५ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवार विजेंदर गुप्ता यांच्या समर्थनार्थ उत्तर-पश्चिम रोहिणी विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांचाही उल्लेख केला.
"दिल्लीची निवडणूक ही लोकांना वाईट प्रशासनापासून मुक्ती देण्यासाठी आहे. केजरीवाल काय आहेत हे तुला जाणून घ्यायचे असेल तर मी महाराष्ट्रातून येतो आणि अण्णा हजारे यांच्यासोबत माझे जवळचे संबंध आहेत. मी आताच त्यांना भेटून येत आलोय. जगातल्या सगळ्यात बेईमान माणूस कोणी असेल तर ते अरविंद केजरीवाल आहेत असं मी नाही तर अण्णा हजारे म्हणतात," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
ऑलिम्पिकमध्ये भ्रष्टाचार करण्याची शर्यत झाली तर केजरीवाल सुवर्णपदक जिंकले असते. दिल्लीचा जलद विकास व्हावा यासाठी त्यांनी मतदारांना दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन करावं लागेल. आप सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे दिल्लीला गटार, गलिच्छ पाणी आणि प्रदूषित हवा यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतोय, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी २०११ मध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर अल्पावधीतच ते प्रसिद्ध झाले. त्यानंतर केजरीवाल यांनी राजकारणाचा मार्ग निवडला. त्यानंतर केजरीवाल आणि अण्णा हजारे वेगळे झाले.