राजधानी दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवारांसाठी द्वारका येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी यमुना नदीच्या दुर्दशेसंदर्भातही चिंता व्यक्त केली. एवढेच नाही, तर दिल्लीत भाजप सरकार सत्तेवर आल्यास, आपण स्वतः या मुद्द्यावर लक्ष देऊन, असा शब्दही पंतप्रधान मोदींनी दिल्लीकरांना दिला आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "दिल्लीत पाण्याची कमतरता, घाणेरडे पाणी आणि यमुनेची स्वच्छता ही एक मोठी समस्या बनली आहे. मोदी पुढे म्हणाले, भारतातील नद्या आपल्या संस्कृतीची जीवनधारा आहेत. आपला इतिहास, आपली अर्थव्यवस्था आणि आपली संस्कृती, यांनी गेली शतकानुशतके नदीकाठावरच मोठी प्रगती केली. यमुना ही केवळ एक नदी नाही, तर भारताच्या आध्यात्मिक आणि आर्थिक शक्तीचे प्रतीक आहे. मात्र आज, 'आप-दा' पार्टीमुळे ती प्रचंड अडचणीत सापडली आहे."
मोदी म्हणाले, माझा पक्का विश्वास आहे की, जेथे राजकीय इच्छाशक्ती असते तेथे बदलाचा मार्ग आपोआप निघतो. मला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून बराच काळ काम करण्याची संधी मिळाली. साबरमती नदीची दुर्दशा पाहून मी प्रचंड अस्वस्थ होत हतो. मी दृढनिश्चय केला आणि मला साबरमती नदीचे पुनरुज्जीवन करण्याची संधी मिळाली. प्रदूषित आणि मृतप्राय नदीचे पुनरुज्जीवन करून, आम्ही अहमदाबादमधील साबरमतीच्या काठावर एक जागतिक दर्जाचा रिव्हर फ्रेंट तयार केला आहे. आज साबरमती रिव्हर फ्रंटने अहमदाबाद शहरालाही नवीन जीवन दिले आहे."
मोदी म्हणाले, "दिल्लीत स्थापन होणारे भाजपचे डबल इंजिन सरकार येथील यमुनाजीचाही कायाकल्प करून दाखवेल. दिल्लीकरांनो, कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. मला अनुभव आहे. मी स्वतः दिल्ली सरकारला वेळ देईन. दिल्लीतील भाजप सरकार यमुना स्वच्छ करून दिल्ली-एनसीआरचे भाविष्य बदलेल."
दिल्लीतील डबल इंजिन भाजप सरकार यासाठी अनेक टप्प्यांवर काम करेल. सर्वप्रथम, आपण यमुनेचे पाणी स्वच्छ करू. दुसरे म्हणजे, आपण यमुनेच्या काठावर एक आधुनिक रिव्हर फ्रंट तयार करू. तिसरे म्हणजे, यमुनेच्या काठावर पर्यटनासाठी एक ग्रीन कॉरिडॉर तयार केला जाईल. एवढेच नाही, तर लोकांना प्रवासाची सोय व्हावी म्हणून वॉटर मेट्रोची शक्यताही तपासली जाईल. आपण कल्पना करू शकता. एकदा अशा पद्धतीने नियोजन करून नदिचा विकास झाला, तर आपल्याला एक सुंदर दिल्ली दिसू लागेल."