'प्रामाणिक असाल तर स्वतःच्या पैशाने लढा', CM आतिशी यांच्या क्राउड फंडिंगवर काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 17:01 IST2025-01-12T17:01:10+5:302025-01-12T17:01:47+5:30
Delhi Assembly Election 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी निवडणूक लढवण्यासाठी मतदारांना पैसे देण्याचे आवाहन केले आहे.

'प्रामाणिक असाल तर स्वतःच्या पैशाने लढा', CM आतिशी यांच्या क्राउड फंडिंगवर काँग्रेसची टीका
Delhi Assembly Election 2025 : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मतदारांना आर्थिक मदतीचे आवाहन केले असून, क्राऊड फंड मोहीम सुरू केली आहे. निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला 40 लाख रुपये हवे आहेत, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या आवाहनानंतर अवघ्या चार तासांतच त्यांना 10 लाख रुपयांहून अधिकची देणगी मिळाली आहे. दरम्यान, यावर काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा यांनी बोचरी टीका केली आहे.
अलका लांबा म्हणतात की, 'आतिशी आज लोकांकडून पैसे मागत आहे. त्या प्रामाणिक असतील, तर त्यांनी स्वतःच्या पैशाने निवडणूक लढवावी. त्यांनी मद्य घोटाळा कसा केला, हे जनतेने पाहिले आहे. आता दिल्लीकरांची फसवणूक होणार नाही. केजरीवाल आणि भाजपने मिळून दिल्लीचा नाश केला. दिल्लीतील जनता आता काँग्रेसकडे आशेने पाहत आहे,' अशी टीका लांबा यांनी केली.
आतिशी यांनी काय आवाहन केले ?
'डोनेट फॉर आतिशी' मोहिमेचा शुभारंभ करत सीएम आतिशी यांनी ट्विट केले की, 'मागील पाच वर्षांपासून तुम्ही आमदार, मंत्री आणि आता मुख्यमंत्री म्हणून माझ्यासोबत आहात. तुमच्या पाठिंब्याशिवाय आणि आशीर्वादाशिवाय हे शक्य झाले नसते. एक तरुण आणि सुशिक्षित महिला म्हणून, तुमचा विश्वास आणि दानशूरता यामुळे मला राजकारणात करिअर करण्याचे स्वप्न पाहायला मिळाले. एक अशी वाट ज्यावर मी एकटी चालू शकत नव्हते. आता आणखी एक निवडणूक आपल्यासमोर आहे आणि मला तुमची पुन्हा गरज आहे. माझ्या क्राउड फंडिंग मोहिमेत योगदान द्या,' असे आवाहन त्यांनी केले.
भाजपचे कपिल मिश्रा म्हणाले...
दुसरीकडे भाजप नेते कपिल मिश्रा यांनीदेखील आतिशी यांच्या आवाहनावर टीका केली. 'यापूर्वी एनआरआय आणि देशभरातील लोक 'आप'ला पैसे द्यायचे, आज मीडियामध्ये येऊन क्राउड फंडिंग करावी लागतीये, ही त्यांची दुर्दशा आहे. हे लोक जनतेपासून दूर गेले आहेत, त्यांचा पराभव अटळ आहे,' अशी टीका त्यांनी केली.