Delhi Assembly Election 2025 Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष तिसऱ्यांदा दिल्लीची सत्ता आपल्या हाती राखण्यात यशस्वी होतो की आपचा पराभव करून भाजप सत्ताधीश बनतो याची सर्वांना उत्सुकता आहे. 'आप'विरोधात भाजप व काँग्रेसने जोरदार प्रचार केला. त्यातील काँग्रेसची कामगिरी वाईट होण्याची तसेच भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता बहुतांश एक्झिट पोलनी व्यक्त केली आहे. मात्र बहुमतासाठी आप किंवा भाजपला काही जागा कमी पडल्यास काँग्रेसची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून 'आप'ला पाठिंबा दिला जाणार की नाही, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं असून नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवलेले काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी आम आदमी पक्षासोबतच्या संभाव्य युतीवर भाष्य केलं आहे.
संदीप दीक्षित हे अरविंद केजरीवाल यांचे टीकाकार म्हणून ओळखले जातात. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवत आम आदमी पक्षावर खरमरीत टीका केली होती. मात्र आता निवडणूक निकालाला अवघे काही तास बाकी असताना दीक्षित यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर आपसोबत युती करायची की नाही, याचा निर्णय हायकमांडकडून घेतला जाईल, अशी माहिती संदीप दीक्षित यांनी दिली आहे.
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान पार पडले. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत ६०.४२ टक्के मतदान झाले आहे.
दरम्यान, विधानसभेच्या ७० जागा असलेल्या दिल्लीत बहुमतासाठी ३६ जागा जिंकणं आवश्यक आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत आपने ६२ तर भाजपने ८ जागा जिंकल्या होत्या. आपने २०१३ मध्ये पहिल्यांदा दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत आपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यावर अरविंद केजरीवालांनी ४९ दिवस सरकार चालवले होते. त्यानंतरच्या झालेल्या निवडणुकीत मात्र केजरीवाल यांनी स्पष्ट बहुमत मिळवले. सलग तीन वेळा आपचे सरकार दिल्लीत राहिले आहे. यावेळी दिल्लीकर केजरीवालांना पुन्हा संधी देणार का की भाजपकडे सत्तेच्या चाव्या देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.