पुढच्या महिना दोन महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे सध्या दिल्लीतील राजकीय वातावरण तापलेलं आहे. मागच्या दहा वर्षांपासून दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाने विजयी हॅटट्रिक करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर देशाच्या राजधानीचं क्षेत्र असलेल्या दिल्लीतील सत्ता मिळवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांकडूनही तयारी सुरू आहे. यादरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी काँग्रेस आणि भाजपावर सनसनाटी आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीत भाजपा आणि काँग्रेसचं साटंलोटं असून, निवडणूक लढवण्यासाठी भाजपा काँग्रेसला फंडिंग करत असल्याचा दावा आतिशी यांनी केला आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी ह्या आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपाकडून काँग्रेसला आर्थिक रसद पुरवली जात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित आणि अजय माकन यांच्याविरोधात कारवाई केली गेली पाहिजे. यावेळ पत्रकार परिषदेमध्ये आतिशी यांच्यासोबत आपचे नेते संजय सिंह हे सुद्धा उपस्थित होते.
त्यांनी पुढे सांगितले की, काँग्रेसच्या उमेदवारांना भाजपाकडून पैसे मिळाले आहेत. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची मतांचं विभाजन घडवण्याच्या योजनेवर काँग्रेसचे नेते काम करत आहेत. तसेच काँग्रेसचे नेते अजय माकन हे भाजपाने दिलेल्या स्क्रिप्टचं वाचन करत आहेत, असा आरोपही आतिशी यांनी केला.
आतिशी पुढे म्हणाल्या की, बुधवारी काँग्रेस पक्षाने अरविंद केजरीवाल आणि माझ्याविरोधात एफआयआर नोंदवली. मात्र आम्ही कुठलीही एफआयआर आजपर्यंत नोंदवलेली नाही. काँग्रेसच्या उमेदवारांचा खर्च हा भाजपाकडून केला जात असल्याची माहिती आम्हाला अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये संदीप दीक्षित आणि फरहाद सुरी हे प्रमुख आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याकडून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत प्रचार का करवून घेतला, असा सवालही आतिशी यांनी विचारला आहे.
काँग्रेसने हे साटंलोटं भाजपाला जिंकवण्यासाठी केलं होतं. जर असं साटंलोटं नसेल तर अजय माकन आणि युवक काँग्रेसच्या नेत्यांविरोधात कारवाई करण्यात यावी. संदीप दीक्षित आणि फरहाद सुरी यांची निवडणूक कोण लढवत आहे, असा सवालही आतिशी यांनी यावेळी विचारला.