ते दोन फोन कॉल्स, २४ तासांत झाला गेम, ‘इंडिया’मधून काँग्रेस अशी झाली वजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:27 IST2025-01-10T15:27:07+5:302025-01-10T15:27:47+5:30
Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर करतानाच इंडिया आघाडीमधून काँग्रेसलाच वजा करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे.

ते दोन फोन कॉल्स, २४ तासांत झाला गेम, ‘इंडिया’मधून काँग्रेस अशी झाली वजा
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससमोर उभी असलेली आव्हानं अधिकच खडतर होताना दिसत आहेत. त्यातच दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष आहे आमने-सामने आले असताना काँग्रेसच्या नेतृत्वात उभ्या राहिलेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीलाही तडे जाताना दिसत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर करतानाच इंडिया आघाडीमधून काँग्रेसलाच वजा करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. त्यामुळे मागच्या काही महिन्यांपर्यंत देशामधील विरोधी पक्षांच्या ऐक्याचं नेतृत्व करणारा काँग्रेस पक्ष एकाकी पडताना दिसत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला काँग्रेस आणि भाजपाविरोधात लढण्यासाठी सर्व प्रमुख विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. इंडिया आघाडीतील दोन प्रमुख पक्ष आमने सामने असल्याने इतर प्रादेशिक पक्षांपैकी काही पक्ष आपल्याला साथ देतील किंवा तटस्थ राहतील, अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेतृत्वाला होती. मात्र प्रत्यक्षात बहुतांश विरोधी पक्षांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अवघ्या २४ तासांत घडलेल्या घडामोडी आणि दोन फोन कॉल्स यांच्या माध्यमातून मित्रपक्षांनीच कांग्रेसला एकटं पाडलं आहे.
त्याचं झालं असं की, हरयाणा आणि महाराष्ट्रातील पराभवानंतर काँग्रेसने दिल्लीमध्ये आक्रमकपणे लढण्याची रणनीती आखली होती. त्याचा परिणामही दिसून येत होता. काँग्रेसने इंडिया आघाडीतील आपला सहकारी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली. मात्र याचं निमित्त करून काँग्रेसलाच इंडिया आघाडीतून बाहेर काढण्याची मागणी अरविंद केजरीवाल यांनी मित्रपक्षांकडे केली. त्यानंतर ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव या इंडिया आघाडीतील प्रभावी नेत्यांनी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. या सर्व घडामोडी अवघ्या २४ तासांमध्ये घडल्या.
यादरम्यान, मंगळवारी अखिलेश यादव यांनी अरविंद केजरीवाल यांना फोन केला. तसेच दिल्लीमध्ये आमाजवादी पक्ष आम आदमी पक्षाला पाठिंबा देईल, असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांना ममता बॅनर्जी यांनीही फोन केला. त्यांनीही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला. केजरीवाल यांनीही तातडीने सोशल मीडियावरून या दोन्ही नेत्यांचे आभार मानले. अशा प्रकारे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या लढाईल अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांनी कांग्रेसला इंडिया आघाडीतून वजा करून टाकले. एवढंच नाही तर अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांच्यानंतर उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव या नेत्यांनीही काँग्रेसऐवजी आपलं वजन आपच्या पारड्यात टाकलं. तेजस्वी यादव यांनी तर इंडिया आघाडी ही केवळ लोकसभेपुरती होती, असं सांगून टाकलं. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष एकटा पडला आहे. अशा परिस्थितीत आता काँग्रेस पक्ष दिल्लीत कशी लढत देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.