Delhi Assembly election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आल्याने प्रचाराला वेग आला आहे. ५ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीनंतर दिल्लीच्या अध्यक्षपदाचे भवितव्य ठरणार आहे. अशातच आज आम आदमी पक्षाचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस समर्थकांना मोठे आवाहन केले. सर्व पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना अरविंद केजरीवालकाँग्रेस समर्थकांना व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काँग्रेसला मत दिल्यास भाजपचा फायदा होईल, असं अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.
काँग्रेस मतदारांना आवाहन करतो की, जर त्यांनी काँग्रेसला मत दिले तर त्याचा एक प्रकारे भाजपलाच फायदा होईल. भाजप आल्यास आमच्याकडून तुम्हाला मिळणाऱ्या सर्व सुविधा बंद होतील, असा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला. अरविंद केजरीवाल यांनी एका व्हिडीओद्वारे काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. काँग्रेस समर्थकांचा उल्लेख करत काही लोक मला खूप दुःखी दिसत होते असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.
काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
"मला आज काँग्रेस पक्षाच्या समर्थकांशी बोलायचे आहे. अलीकडे काही लोक मला भेटायला आले. मी त्यांना विचारले की तुम्ही कोणाला मत देणार. त्यांनी काँग्रेसला मत देणार असं म्हटलं. मी त्यांना विचारले की, दिल्लीत काँग्रेसचे अस्तित्व नसताना तुम्ही त्यांना का मतदान करणार आहात? ते म्हणाले की आम्ही वर्षानुवर्षे काँग्रेसचे बटण दाबतो आणि आता सवय झाली आहे. काँग्रेस आता पूर्वीसारखी राहिली नाही. ते म्हणाले की, काँग्रेसच्या विजयासाठी काँग्रेस समर्थक जेवढे काम करतात, तेवढेच पक्षाचे नेते पक्षाचा पराभव करण्यात व्यस्त आहेत. ते म्हणाले की, दिल्लीत काँग्रेसचे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे 'आप'ला कोणत्याही प्रकारे पराभूत करणे. काँग्रेस दिल्लीत एकही जागा जिंकण्यासाठी लढत नाहीये. ते फक्त 'आप'ला हरवण्यासाठी भाजपशी लढत आहेत. काँग्रेस नेते भाजपच्या नेत्यांविरोधात काहीही बोलत नाहीत तर फक्त 'आप'च्या नेत्यांविरोधात बोलतात. मी त्यांना सांगितले की त्यांनी काँग्रेसला मत दिल्यास भाजपचा फायदा होईल," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
निवडणूक आयोगाला राजकारण करायचे असेल तर निवडणूक लढवा - अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर निशाणा साधला. यापूर्वी त्यांनी हरियाणा सरकार यमुना नदीत विषप्रयोग करत असल्याचा दावा केला होता. या विधानावर निवडणूक आयोगाने त्यांचे उत्तर मागितले होते. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी त्यांनी वापरलेली भाषा निवडणूक आयोगाचे काम नाही. त्यांनी दिल्लीतील एखाद्या जागेवरून निवडणूक लढवावी. येत्या दोन दिवसांत ते मला अटक करणार आहेत, हे मला माहीत आहे. पण मी घाबरत नाही, असं म्हटलं.