दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जोरदार टोला लगावला आहे. ते म्हणाले, "दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जे काही बोलले, त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. दिल्लीतील लोकही या मुद्द्यावर पूर्णपणे सहमत आहेत. काल त्यांनी फार चांगला मुद्दा मांडला." याच वेळी केजरीवाल यांनी योगी आदित्यनाथ यांना एक खास आवाहनही केले आहे. केजरीवाल म्हणाले, "त्यांनी (योगी आदित्यनाथ) अमित शहा यांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर मार्गदर्शन करावे आणि बसून हे समजावून सांगावे."
खरेतर, काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन जाहीर सभांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षावरही जोरदार निशाणा साधला. यानंतर, आता अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, "काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. मी त्याच्याशी १०० टक्के सहमत आहे. योगीजींनी दावा केला की त्यांनी उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारली. जर हे खरे असेल तर, त्यांनी अमित शाह यांच्यासोबत बसून त्यांना ते समजावून सांगावे कारण दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी अमित शाह यांच्यावर आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीत गुंड मुक्तपणे संचार करत आहेत. मोठ-मोठ्या गुंडांचे ११ गट आहेत. त्यांनी संपूर्ण दिल्ली ११ भागांत विभागली आहे. मोठ्या उद्योगपतीना ३ कोटी, ४ कोटी रुपये द्या अन्यथा तुमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून टाकू, अशा धमक्या देणारे फोन जात आहेत. दिल्लीत रोज १० मुले आणि १० महिलांचे अपहरण होत आहे. चाकूहल्ला आणि दरोड्याच्या घटना घडत आहेत. संपूर्ण दिल्लीत घबराट आहे. काल योगीजींनी अतिशय योग्य मुद्दा उपस्थित केला.