आज दिल्ली विधानसभा निवडमुकीचे निकाल येत आहेत. सर्व 70 जागांवरील कल समोर आले आहेत. आतापर्यंतत्या निकालात भाजपला मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. यातच आता जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी काँग्रेस आणि आपवर निशाणा साधला आहे. "और लडो आपस में", असे उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सुरुवातीला आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या आघाडीसंदर्भात चर्चा सुरू होती. मात्र प्रत्यक्षात असे होऊ शकले नाही. दिल्लीपूर्वी हरियाणामध्येही काँग्रेस आणि आप यांच आघाडी होऊ शकली नव्हती. तेव्हा हरियाणामध्ये भाजपला सलग तिसऱ्यांदा विजय मिळाला. यामुळे, आता पुन्हा एकदा दिल्लीच्या निकालात भाजपला मिळत असलेल्या आघाडीवरून उमर अब्दुल्ला यांनी आप आणि काँग्रेसवर अशा शब्दात साधलेला हा निशाणा बरेच काही सांगणार आहे.
शेअर केला 'महाभारत' मालिकेतील सीन -सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 'महाभारत' मालिकेतील एक सीन शेअर करत उमर अब्दुल्ला यांनी केवळ "और लडो आपस में!" एवढेच लिहिले आहे. आज येत असलेले दिल्ली विधानसभेचे निकाल आणि त्यांची ही पोस्ट, यावरून दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपने वेगवेगळे निवडणूक लढण्याच्या घेतलेल्या निर्णयावर आहे, हे स्पष्ट होते.
खरे ठरताना दिसत आहेत एक्झिटपोल -खरे तर, एक्झिट पोलचे निकाल हे काँग्रेससाठी मोठा धक्का होता. कारण गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. मात्र यावेळी काँग्रेसला काहीशा आशा होत्या. पण, एक्झिट पोलने त्याही धुसर केल्या. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, एक्झिटपोल खरे ठरताना दिसत आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना आणि आप पराभूत होताना दिसत आहे.