Delhi Election Result : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळत आहे. २७ वर्षानंतर भाजप दिल्लीत सत्तेवर येताना दिसत आहे. अशातच दिल्लीतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी एक मोठे विधान केले आहे. दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होताच पहिल्या मंत्रिमंडळातच एसआयटी स्थापन केली जाईल आणि आप सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी केली जाईल, असे वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटले आहे.
अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यावर पुन्हा एकदा कठोर कारवाई केली जाईल. चौकशीदरम्यान अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना तुरुंगातही जावे लागू शकते, असे म्हटले जात जात आहे. दरम्यान, नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा निवडणूक पराभव होताच उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने दिल्ली सचिवालयात पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी कागदपत्रे आणि डेटा संरक्षित करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, दिल्लीतील आपच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. यातील सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा आरोप मद्य धोरणाबाबत आहे. या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून, अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयने माजी मंत्री सत्येंद्र जैन, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली. तसेच, या प्रकरणात त्यांना तुरुंगवास सु्द्धा झाला. आता भाजप सत्तेत येताच या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची पुन्हा एकदा चौकशी केली जाईल, असे म्हटले जात आहे.
२७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपची सत्ता येणारविधानसभा निवडणूक निकालांवरून हे स्पष्ट झाले आहे की, भाजप २७ वर्षांनंतर दिल्लीत पुन्हा सत्तेत येणार आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, दुपारी १ वाजेपर्यंतच्या ट्रेंडमध्ये, भाजप दिल्लीतील ७० पैकी ४८ जागांवर निर्णायक बहुमताकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे, तर आप २२ जागांवर आहे.