Delhi Election Result 2025: काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल येण्यापूर्वीच काँग्रेसचा पराभव मान्य केला आहे. त्यांच्या एका विधानावरून हे स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील जनतेने ज्याला कुणाला निवडले असेल, काँग्रेस त्यांच्यासोबतीने काम करेल.
दिल्लीच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष आणि नेते सरकारसोबत एकजुटीने काम करतील -रॉबर्ट वाड्रा म्हणाले, "मी केवळ एवढेच म्हणेन की, दिल्लीतील जनतेने निवडलेल्या पक्षाने, दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करावीत. आम्हाला प्रदूषणापासून मुक्ती हवी आहे, आम्हाला महिलांची सुरक्षितता हवी आहे, आम्हाला येथील पायाभूत सुविधांमध्ये बदल हवे आहेत. मला माहित आहे की, काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे सर्व नेते कोणतेही सरकार आले तरी, दिल्लीच्या विकासासाठी त्यांच्यासोबत एकजुटीने काम करतील."
"घोडेबाजार होऊ नये, ...तर तरुण दिल्ली सोडणार नाहीत" -"मी असेही म्हणेन की, प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे, त्याकडे लक्ष द्यायला हवे. सरकार स्थापन करण्यासाठी घोडेबाजार होऊ नये. लोकांनी दिलेले मत महत्त्वाचे आहे. कोणताही पक्ष आला तरी त्याने लोकांच्या हितासाठी काम करायला हवे. दिल्ली ही आपली राष्ट्रीय राजधानी आहे. संपूर्ण जग दिल्लीकडे पाहत आहे. प्रदूषण, पायाभूत सुविधा, महिलांची असुरक्षितता इत्यादींमुळे नवीन पिढी त्रस्त आहे. जर हे सर्व व्यवस्थित झाले तर तरुण दिल्ली सोडणार नाहीत," असेही वाड्रा म्हणाले.
एक्झिट पोलचे निकाल हे काँग्रेससाठी मोठा धक्का -खरे तर, एक्झिट पोलचे निकाल हे काँग्रेससाठी मोठा धक्का आहेत. कारण गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. मात्र यावेळी काँग्रेसला काहीशा आशा होत्या. मात्र, एक्झिट पोलने त्याही धुसर केल्या. जर एक्झिट पोल खरे ठरले तर पक्षाला केवळ एक अथवा दोनच जागा मिळू शकतील.