नवी दिल्ली : दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने सर्व 70 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे पार्टीकडून 15 विद्यमान आमदारांना या निवडणुकीत उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे पार्टीच्या आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
याविषयी बोलताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, पार्टीकडून आपल्या स्तरावर सर्व आमदारांच्या कामाचा सर्व्हे करण्यात आला आणि जनतेने दिलेल्या प्रतिसादानुसार तिकिटांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ज्यांचे तिकीट कापण्यात आले आहे, ते आता कोणताही आरोप करत आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे मनीष सिसोदिया यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
दुसऱ्या पक्षातील नेत्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. यावर बोलताना मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, ज्या लोकांना काँग्रेस आणि भाजपा यासारख्या पक्षांतून निराशा मिळाली आहे, ते आम आदमी पार्टीत आले आहेत. त्यांची लोकांध्ये असलेली प्रतिमा पाहून त्यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.
याचबरोबर, बदरपूरचे आमदार राहिलेले नारायण दत्त शर्मा यांनी आम आदमी पार्टीवर तिकिट व्रिकीचा आरोप केला आहे. याविषयी मनीष सिसोदिया म्हणाले, "ज्यावेळी कोणाचेही तिकीट कापले जाते, त्यावेळी त्याला थोडीफार निराशा होते. नारायण दत्त शर्मा यांना काही शंका असल्यास आम्ही चर्चेतून दूर करू," याशिवाय, या निडणुकीत आम आदमी पार्टीचा सर्व जागांवर विजय होईल. 70 पैकी 70 जागा आम्ही जिंकू आणि हा तर जनतेचा आवाज आहे. यावेळी तीन जागा सुद्धा सुटणार नाहीत, असेही मनीष सिसोदिया यांनी सांगितले.
(भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, '...तर राजकारणातून संन्यास घेईन')
आम आदमी पार्टीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत 14 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पतपरगंज येथून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. 70 सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकत निर्विवाद विजय मिळवला होता. भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, '...तर राजकारणातून संन्यास घेईन'
CAA: मोदींच्या गुजरातमध्ये विरोधाचे पतंग गुल; उडवण्यापूर्वीच पोलिसांकडून जप्त
अर्जुनाच्या बाणांमध्ये होती अणुशक्ती! बंगालच्या राज्यपालांचा दावा
सीएएवर मलेशियाच्या पंतप्रधानांची आगपाखड, भारत असा शिकवणार धडा
शिवसेनेने केली भाजपसोबत हातमिळवणी; महाविकास आघाडीला फासला हरताळ