नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. 70 सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीवासीयांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काम आम आदमी पार्टीच्या सरकारने केल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तर, दिल्लीतील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल सरकावर भाजपाने केला आहे. तसेच, पुढील पाच वर्षात केजरीवाल सरकारपेक्षा पाच पटीने जास्त काम करण्याचा दावा भाजपाने केला आहे.
भाजपाने पुढील पाच वर्षांत केजरीवाल सरकारपेक्षा पाच पटीने अधिक काम दिल्लीतील जनतेसाठी केले नाही, तर राजकारणातून संन्यास घेईन, असे भाजपाचे दिल्लीतील प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी एका मुलाखतीत सांगितले. शाळा, बेरोजगारांना नोकऱ्या, प्रत्येक नागरिकाला अनुदान दिल्याचा जो काय दावा आम आदमी पार्टीने गेल्या पाच वर्षात केला आहे, त्याच्या पाच पटीने भाजपा दिल्लीतील जनतेला देईल, असे मनोज तिवारी म्हणाले.
प्रत्येक घरात शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. हवेतील प्रदूषण कमी करू. पाच हजार नवीन इलेक्ट्रॉनिक बसेस याशिवाय सीएनजी बसेससोबत दिल्लीच्या ट्रान्सपोक्ट कनेक्टिव्हिटी चांगली करण्याचे लक्ष्य आहे. दिल्लीत बंद होण्याचा मार्गावर असलेल्या रुग्णालयांसाठी योग्य मार्ग काढण्याच प्रयत्न करण्यात येईल, असे मनोज तिवारी यांनी सांगितले.
याचबरोबर, यमुना नदीवर रिव्हर फ्रंट तयार केला जाईल. तसेच, ज्याठिकाणी झोपडपट्टी आहे, त्याठिकाणी आवास योजनेच्या माध्यमातून लोकांसाठी घरांची व्यवस्था करण्यात येईल. गॅस, पाण्याचे कनेक्शन आणि शौचालय यांसारख्या सुविधा चांगल्या केल्या जातील, असेही मनोज तिवारी यांनी सांगितले.
दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसही दिल्लीमधील आपला दुरावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे.
2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकत निर्विवाद विजय मिळवला होता. भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नव्हता.