Delhi Assembly Elections Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. भारतीय जनता पक्ष २७ वर्षांनंतर राजधानीत सरकार स्थापन करणार आहे. दिल्लीत गेली १० वर्षे सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा दणदणीत पराभव झाला. तर काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. मात्र आता काँग्रेसमुळेआपला हा दिवस पाहावा लागलाय अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. ७० जागांपैकी १४ जागांवर काँग्रेसमुळे आपला पराभवाला सामोरे जावे लागल्याचे म्हटलं जात आहे.
इंडिया आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेस आणि आपने दिल्ली निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये दिसून आला. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्षाची युती झाली असती तरी एवढा मोठा पराभव झाला नसता असं म्हटलं जात आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही याबाबत भाष्य केलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीत १४ अशा जागा आहेत जिथे भाजपचे उमेदवार विजयी झाले असून आपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भाजप आणि आपच्या उमेदवारांमधील अंतर काँग्रेसला मिळालेल्या मतांपेक्षा कमी आहे. मात्र, काँग्रेसने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. आपला विजय मिळवून देण्याची जबाबदारी काँग्रेसची नाही, असे पक्षाने म्हटलं.
भाजप आणि आपमधील अनेक जागांवर पराभवाचे अंतर १५०० मतांपेक्षा कमी आहे. संगम विहार मतदारसंघातून आपचे दिनेश मोहनिया यांचा ३४४ मतांनी पराभव झाला. भाजपचे चंदन कुमार चौधरी यांना ५४,०४९ तर मोहनिया यांना ५३,७०५ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार हर्ष चौधरी १५,८६३ यांना मते मिळाली.
त्रिलोकपुरी जागेवर भाजपच्या रविकांत यांनी आपच्या अंजना परचा यांचा ३९२ मतांनी पराभव केला. रविकांत यांना ५८,२१७, तर परचा यांना ५७,८२५ मते मिळाली. तर काँग्रेसचे अमरदीप ६,१४७ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
आपचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात भाजपच्या तरविंदर सिंग मारवाह यांनी जंगपुरा मतदारसंघात ६७५ मतांनी विजय मिळवला. मारवाह यांना ३८,८५९ मते मिळाली, तर सिसोदिया यांना ३८,१८४ मते मिळाली. काँग्रेसचे फरहाद सूरी यांना ७,३५० मते मिळाली.
राजिंदर नगर जागेवर भाजपच्या उमंग बजाज यांनी आपच्या दुर्गेश पाठक यांचा १,२३१ मतांनी पराभव केला. बजाज यांना ४६,६७१ तर पाठक यांना ४५,४४० मते मिळाली. काँग्रेसचे विनीत यादव ४,०१५ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
आपचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः नवी दिल्लीच्या जागेसाठी रिंगणात होते. भाजपचे परवेश साहिब सिंग यांनी त्यांचा ४०८९ मतांनी पराभव केला. प्रवेश यांना ३००८८, केजरीवाल यांना २५९९९ मते आणि काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या संदीप दीक्षित यांना ४५६८ मते मिळाली.
विधानसभा मतदारसंघ | आपचा इतक्या मतांनी पराभव | काँग्रेसला मिळालेली मते |
संगम विहार | ३४४ | १५८६३ |
त्रिलोकपुरी | ३९२ | ६१४७ |
जंगपुरा | ६७५ | ७३५० |
तिमारपूर | ६९६ | ७८२७ |
राजेंद्र नगर | १२३१ | ४०१५ |
मालवीय नगर | २१३१ | ६७७० |
ग्रेटर कैलाश | ३१८८ | ६७११ |
नवी दिल्ली | ४०८९ | ४५६८ |
छतरपूर | ६२३९ | ६६०१ |
मेहरौली | ८२१८ | ९३३८ |
मादीपूर | १०८९९ | १७९५८ |
बादली | १५१६३ | ४१०७१ |
कस्तुरबा नगर | १९४५० | २७०१९ |
नांगलोई जाट | २६२५१ | ३२०२८ |