एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : कोरोना महामारीला रोखण्यासाठी अजून लसीकरण सुरूही झाले नसताना बर्ड फ्लू आतापर्यंत नऊ राज्यांत आला असून त्यात दिल्ली दहावे राज्य समाविष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी आठ बदकांचे नमुने तपासणीसाठी पाठविले गेले होते. त्यांच्या अहवालात तीन बदके आणि पाच कावळ्यांत बर्ड फ्लूला दुजोरा मिळाला. याशिवाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही बर्ड फ्लूला पुष्टी मिळाली आहे. त्या आधी मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरयाणा आणि केरळमध्ये बर्ड फ्लूची प्रकरणे समोर आली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत: अधिकाऱ्यांसोबत बोलून बर्ड फ्लूचा फैलाव रोखण्यावर निगरानी करीत आहेत.
आयसीएआर-एनआयएचएसएडीच्या परीक्षण अहवालात मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि दापोलीत पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याला दुजोरा मिळाला. पशुपालन सचिव अनूप कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सतर्कता वाढवण्यास सांगितले आहे. दिल्लीत पशुपालन विभागानुसार जालंधरला पाठवले गेलेले ८ नमुने सकारात्मक आले आहेत. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. गेल्या चार दिवसांत ९७ कावळे व २७ बदकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत बर्ड फ्लूला दुजाेरा मिळाल्यानंतर इतर राज्यांतून येणारे प्रोसेस्ड चिकन आणि लाइव्ह स्टॉकवर बंदी घातली गेली आहे. याबरोबर दिल्लीत कोंबडी बाजारही बंद राहील. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी संजय झीलमधील बदकांचे नमुने सकारात्मक आले आहेत म्हणून झीलच्या क्षेत्राला सॅनिटाइज केले जात आहे, असे सोमवारी सांगितले.
सिसोदिया म्हणाले, जालंधरला पाठविलेल्या १०० नमुन्यांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. परंतु, दिल्लीत बर्ड फ्लूने घाबरून जायची गरज नाही. खबरदारीचा उपाय म्हणून लाइव्ह स्टॉक, कोंबड्या इत्यादी बाहेरून आणण्यास १० दिवस बंदी आहे. पॅकेज्ड चिकन किंवा प्रोसेस्ड चिकनही बाहेरून आणून विकण्यावर बंदी आहे. इतर राज्यांतून होणारे संक्रमण रोखण्यासाठी हा उपाय आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. बर्ड फ्लूने घाबरायचे कारण नाही कारण तो सामान्य इन्फ्लूएंजा आहे. दिल्ली सरकारचा पशुपालन विभाग, विकास विभागाची सर्व ४८ रुग्णालयांचे डॉक्टर सतत राज्यभर बर्ड फ्लूची निगरानी करीत आहेत. सोबतच ११ रॅपिड रिस्पॉन्स टीम बनवली गेली आहे. ही टीम सतत नमुने गोळा करत आहे, असे मनीष सिसोदिया म्हणाले.