नवी दिल्ली - विवेक अग्निहोत्री यांच्या 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटावरून भाजप आणि आम आदमी पार्टीतील संघर्ष वाढत चालला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चित्रपटासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही पक्ष अनेक वेळा एकमेकांना भिडले आहेत. सीएम केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या गदारोळानंतर आता पूर्व दिल्लीतील महापालिकेच्या सभागृहात भाजप आणि आपचे नेते आमनेसामने आले. येथेच दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बाचाबाचीही झाली. एवढेच नाही, तर यांच्यातील हाणामारीचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सीएम केजरीवाल यांच्या वक्तव्यावरून घमासान -भाजप आणि आपचे नेते बुधवारी पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहात (EDMC) जमले होते. सभागृहाच्या बैठकीदरम्यान भाजप नगरसेवकांनी निषेधाचा ठराव आणला होता. दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काश्मिरी पंडितांची चेष्टा केली, असा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. तसेच, सीएम केजरीवाल यांच्या वक्तव्याबद्दल आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आणि नगरसेवकांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली होती.
भाजपा आणि AAP च्या नगरसेवकांत तुंबळ हाणामारी -भाजप नगरसेवकांच्या मागणीवर आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केला. यानंतर प्रकरण एवढे वाढले की, आपचे नगरसेवक सभागृहनेत्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी गदारोळ सुरू केला. यानंतर, काही वेळातच दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या हाणामारीत अनेक नेते जखमी झाले आहेत. तर काही नगरसेवकांचे कपडेही फाटले आहेत.