नवी दिल्ली: सत्ताधारी भाजपानं लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मिशन 2019 च्या पार्श्वभूमीवर भाजपा 26 फेब्रुवारीला देशभरात दिवाळी साजरी करणार आहे. भाजपाकडून कमल ज्योती संकल्प उत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या योजनांचे लाभार्थी असलेल्या लोकांच्या घरात दिवे लावले जाणार आहेत. हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक घराला भाजपाशी जोडण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात येणार आहे. या उपक्रमाला कमल ज्योती संकल्प उत्सव असं नाव देण्यात आलं आहे. या अंतर्गत मोदी सरकारच्या योजनांचे लाभार्थी असलेल्या घरांमध्ये दिवे लावण्यात येतील. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, स्टँड अप इंडिया, मुद्रा योजना, जन-धन योजना यासारख्या योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन भाजपा 26 फेब्रुवारीला दिवे लावणार आहे. येत्या निवडणुकीत भाजपालाच मतदान करा, असं आवाहनही यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केलं जाणार आहे. याशिवाय भाजपा 12 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत 'मेरा परिवार भाजपा परिवार' अभियान राबवणार आहे. या दरम्यान भाजपाचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर भाजपाचं स्टिकर लावतील. याशिवाय घराच्या छतावर भाजपाचा झेंडाही लावण्यात येईल. 2 मार्चला दिल्ली भाजपाकडून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात बाईक रॅली काढण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 500 ते 1000 कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत.
...म्हणून भाजपा 26 फेब्रुवारीला साजरी करणार दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 8:52 AM