ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - नवी दिल्लीचे भाजपाचे अध्यक्ष व खासदार मनोज तिवारी यांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. नॉर्थ ईस्ट दिल्लीतील तिवारी यांच्या निवासस्थानावर रविवारी उशीरा रात्री अज्ञातांनी हल्ला केला.
ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा तिवारींच्या घरातील कर्मचारी व हल्लेखोरांमध्ये मारहाणदेखील झाली. सुदैवानं मनोत तिवारी तेव्हा निवासस्थानी नव्हते. हल्ल्याची माहिती मिळताच ते तातडीने घरी पोहोचले. घडल्या प्रकाराबाबत तिवारी यांनी स्वतः ट्विट करुन सांगितले की, "नॉर्थ्य अॅव्हेन्यूमधील १५९ क्रमांकाच्या निवासस्थानावर 8 ते 10 जणांनी हल्ला केला आहे". पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने चार संशियतांनी ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेबाबत मीडियासोबत संवाद साधताना मनोज तिवारी यांनी सांगितले की, "हा प्राणघातक हल्ला होता. या हल्ल्यात माझी 2 लोकं जखमी झाली आहेत. यामागे मला मोठा कटकारस्थान दिसत आहे. या कटात पोलिसांचाही सहभाग असल्याचा संशय आहे. हल्ल्यामागील कोणाचीही सुटका होणार नाही.", असा इशाराही तिवारी यांनी यावेळी दिला.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, "हल्लेखोरांमध्ये एकूण 7-8 जणांचा समावेश होता. त्यांचा नेमका उद्देश काय होता हे मात्र समजलं नाही. पण ते सर्वजण अर्वाच्यभाषेत बातचित करत होते. त्यांना पोलिसांचीही भीती वाटत नव्हती."
दरम्यान, या प्रकरणाची माहिती गृह मंत्रालयाला देणार असल्याचे मनोज तिवारी यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या दिल्ली महानगरपालिका निवडणुकांची जबाबदारी मनोज तिवारी यांच्यावर होती. विशेष म्हणजे, त्यांच्या नेतृत्वात भाजपाला दिल्ली मनपा निवडणुकीत मोठे यश मिळाले. तीन महापालिकांमध्ये भाजपाने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला.