Virendra Sachdeva : गेल्या काही दिवसांपासून यमुना नदीच्या दुर्दशेवरून दिल्लीत राजकारण तापले आहे. दरवर्षी छठ सणाच्या वेळी यमुना नदीचे प्रदूषण हे नेहमीच चर्चेत असते. या मुद्द्यावरून दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी गुरुवारी आप सरकारविरोधात अनोखे आंदोलन केले होते. आयटीओ घाटावर त्यांनी यमुनेत स्नान केले होते. त्यानंतर आता यमुनेतल्या प्रदुषणामुळे वींरेंद्र सचदेवा यांची प्रकृती बिघडली आहे. वीरेंद्र सचदेवा हे राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल आहेत. वीरेंद्र सचदेवा यांना त्वचेचा संसर्ग वाढला आहे. त्यांना खाज सुटणे आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे.
दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्वचेच्या संसर्गासोबतच त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. वीरेंद्र सचदेवा यांनी यमुना नदीच्या घाण पाण्यात उडी मारली होती. त्यानंतर आता त्यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समोर आलं आहे.
वीरेंद्र सचदेवा यांनी यमुनेत उडी मारत दिल्ली सरकारवर ८५०० कोटी रुपयांचा यमुना सफाई घोटाळा केल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी दिल्ली सरकारच्या चुकांची माफी मागितली होती. त्यानंतर दुपारपासून सचदेवा यांना त्वचेवर पुरळ, खाज आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या त्रासामुळे त्यांनी राम मनोहर लोहिया हॉस्पिटल गाठले, तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना तीन दिवसांचे औषध दिले आहे.
यमुना काठाला भेट देताना सचदेवा यांनी आप नेत्या मुख्यमंत्री आतिशी आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना नदीच्या स्थितीची पाहणी करण्याचे आव्हान दिले होते. अरविंद केजरीवाल यांनी १० वर्षे मुख्यमंत्री म्हणून वापरलेल्या 'शीश महल'चा संदर्भ देत सचदेवा यांनी निशाणा साधला होता. "आम्ही रेड कार्पेटची व्यवस्था केली आहे कारण शीश महलमध्ये राहणाऱ्या लोकांना याची सवय आहे. आम्ही दोन खुर्च्यांची व्यवस्थाही केली आहे कारण ही परंपरा आतिषी यांनी स्वतः सुरू केली होती. ते आले तर त्यांना दोन खुर्च्या लागतील," असं सचदेवा यांनी म्हटलं होतं.
"यमुना स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या ८,५०० कोटी रुपयांचा हिशेब सत्ताधाऱ्यांना द्यावा लागेल. दिल्लीत पानिपत आणि सोनीपतच्या नाल्यांतून औद्योगिक कचरा येत आहे. याबाबत गंभीर असाल तर तुम्ही हरियाणा सरकारशी बोलून औद्योगिक कचरा वळवण्याची परवानगी घ्यावी," असेही वीरेंद्र सचदेवा म्हणाले.