लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): येथील इस्रायल दूतावासाजवळ मंगळवारी झालेल्या स्फोट प्रकरणात दोन संशयित तरुण सीसीटीव्हीत कैद झाल्याचे सूत्रांनी बुधवारी सांगितले.
स्फोटाच्या काही वेळापूर्वी घटनास्थळाजवळील रस्त्यावरून दोन तरुण चालताना दिसले. सुरक्षा यंत्रणांनी अब्दुल कलाम रोड आणि पृथ्वीराज रोडवरील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. राष्ट्रीय संरक्षण दल आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी बुधवारी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी झाडांची पाने आणि गवताचे नमुनेदेखील गोळा केले, ज्यात स्फोटात वापरलेली रसायने सापडण्याची शक्यता आहे.
रासायनिक स्फोट?
घटनास्थळी स्फोटकांचे कोणतेही अवशेष सापडले नसल्याने ‘रासायनिक स्फोटा’ची शक्यता नाकारता येत नाही. घटनास्थळी इस्रायली राजदूताला अपमानास्पद भाषेत संबोधित केलेले पत्र सापडले आहे. त्यावरील बोटांचे ठसे ओळखण्यास ते फॉरेन्सिककडे पाठविले आहे. हे पत्र इंग्रजी भाषेत असून, पत्रात ज्यू, पॅलेस्टाईन आणि गाझा असे शब्द लिहिलेले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.