दिल्लीतील मुस्तफाबाद परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री २:३०-३:०० च्या सुमारास एक चार मजली इमारत अचानक कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत. इमारत कोसळल्याने लोक ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे ज्यामध्ये इमारत कोसळताना दिसत आहे.
१७ सेकंदाचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आहे. इमारत कोसळताच सर्वत्र धूळ उडालेली पाहायला मिळते. अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. चांदनी, दानिश, रेश्मा आणि नावेद अशी मृतांची नावे आहेत. सध्या १८ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे, त्यापैकी १४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेले असण्याची शक्यता आहे.
एनडीआरएफ, डॉग स्क्वॉड, दिल्ली पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या टीम मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. स्थानिक लोक बचाव कार्यात मदत करत आहेत. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, इमारत जुनी नव्हती, चांगल्या स्थितीत होती, परंतु भूखंड 'एल' शेपमध्ये होता जो इमारत कोसळण्याचं कारण असू शकतो. दिल्ली अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, आम्हाला २:५० वाजता इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा संपूर्ण इमारत कोसळली होती आणि लोक ढिगाऱ्याखाली अडकले होते. एनडीआरएफ, दिल्ली अग्निशमन सेवा लोकांना वाचवण्यासाठी काम करत आहेत.
या दुर्घटनेवर मुस्तफाबादचे भाजपा आमदार मोहन सिंह बिष्ट म्हणाले की, "मी दोन महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की, ही इमारत दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते. आता इमारत कोसळली आहे. जाणीवपूर्वक आमंत्रण देण्यात आले. येथे बांधकाम कायद्यांकडे लक्ष दिले जात नाही. अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मुस्तफाबादमध्ये सर्वत्र बेकायदेशीर इमारती बांधल्या जातात."